मागील आठवड्यात बसुर्ते ब्रह्मलिंग देवस्थानातील चोरीची घटना ताजी असतानाच बेकिनकेरे (ता. बेळगाव) गावचे ग्रामदैवत श्री नागनाथ देवस्थान येथे काल शुक्रवारी रात्री झालेल्या धाडसी चोरीमुळे परिसरात एकच खळबळ माजली आहे. या घटनेत चोरट्यांनी ५ लाख रुपयांचा ऐवज लांबविला आहे.
याबाबत घटनास्थळावरून प्राप्त माहितीनुसार, काल रात्री उशिरा अंधाराचा फायदा घेत चोरट्यांनी मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वाराचे साखळी व लाकडी अशा दोन्ही दरवाजांचे कुलूप तोडले. यानंतर मुख्य गाभाऱ्याचे कुलूप तोडून त्यांनी गाभाऱ्यात प्रवेश केला आणि नागनाथ मूर्ती वरील सहा किलो वजनाचा चांदीचा मुकूट आणि मंदिरातील अन्य किंमती ऐवज लंपास करून चोरटे फरार झाले.
दरम्यान आज सकाळी नियमित पूजेसाठी मंदिराचे पुजारी कलाप्पा गावडे गेले असता सदरची घटना उघडकीस आली. मंदिरचे दरवाजे अर्धवट उघडे होते. हे पाहताच त्यांनी शेताकडे जाणारे खाचु सावंत यांच्यासह ग्रामस्थांना घटनेची माहिती दिली. चोरीची घटना समजताच ग्रामस्थांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती.
यानंतर काकती पोलिस निरीक्षकांना सदर घटनेची माहिती देण्यात आली. माहिती मिळताच काकती पोलीस स्थानकाचे निरीक्षक विजयकुमार सिन्नूर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी श्वान पथकासह तात्काळ घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. याप्रकरणीची काकती पोलीस स्थानकात नोंद झाली असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
चोरीच्या घटनेनंतर ग्रामस्थ, देवस्थान कमिटी तसेच भक्तांकडून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. सहा वर्षात नागनाथ मंदिरात तिसऱ्यांदा चोरीची घटना घडली असून यापूर्वी मंदिरातील तांब्याच्या वस्तूंची चोरी करण्यात आली होती, यानंतर दोन वर्षांपूर्वी मंदिराच्या छतावर चढून खिडकी कापून सभागृहातील देणगी पेटी तोडुन पंचवीस ते पस्तीस हजार रोख रक्कमेची चोरी झाली होती. चोरी करणाऱ्या टोळ्या परप्रांतीय आहेत की या भागातील याचा उलगडा करणे गरजेचे आहे अशी चर्चा पश्चिम भागातील लोकांतून सुरू आहे.
0 Comments