बेळगाव / क्रीडा प्रतिनिधी 

भरतेश एज्युकेशन ट्रस्टने हिरक महोत्सवी सोहळ्यानिमित्त ज्योतिर्लिंग ट्रॅक स्पोर्ट्सच्या सहकार्याने दि. २२ आणि २३ डिसेंबर रोजी जिल्हा क्रीडांगणावर आयोजित केलेल्या मेगा स्पोर्ट्स इव्हेंट "संघर्ष-टू-रन ॲथलेटिक्स चॅम्पियनशिप २०२२" चे आज शानदार उद्घाटन झाले. उद्घाटन समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून कर्नाटक राज्याचे शालेय शिक्षण आणि साक्षरता मंत्री  बी. सी. नागेश उपस्थित होते. त्यांनी हवेत फुगे सोडवून या मेगा स्पोर्ट्स इव्हेंटला चालना दिली. तत्पूर्वी राष्ट्रीय स्तरावरील ॲथलेटिक्सपट्टूनी मंत्री बी. सी. नागेश यांच्याकडे क्रीडाज्योत सुपूर्द केली. भरतेश एज्युकेशन ट्रस्टचे सचिव श्रीपाल खेमलापूरे हे या समारंभाच्या अध्यक्षस्थानी  होते.

कर्नाटक,महाराष्ट्र आणि गोवा राज्यातील विविध शाळा आणि महाविद्यालयांच्या सुमारे १५०० हून अधिक विद्यार्थ्यांनी  या मेगा स्पोर्ट्स इव्हेंटमध्ये (स्पर्धेत) सहभागी होण्यासाठी  नोंदणी केली आहे. सदर इव्हेंटमध्ये (स्पर्धेत) होणाऱ्या सर्व स्पर्धांमधील विजेत्या खेळाडूंना ५ लाख रुपयांची बक्षीसे दिली जातील. या स्पर्धेतील सहभागी खेळाडू दि. ११ जानेवारी २०२३ पासून पटना (बिहार) येथे होणाऱ्या आंतर जिल्हा राष्ट्रीय ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपच्या निवड चाचणीसाठी पात्र ठरतील.

या उद्घाटन सोहळ्यावेळी राष्ट्रीय स्तरावरील ॲथलेटिकपटू आणि त्यांच्या पालकांचा मंत्री बी. सी. नागेश, आमदार अनिल बेनके, विधान परिषद सदस्य हणमंत निराणी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी बेळगाव उत्तरचे आमदार ॲड.अनिल बेनके, विधान परिषद सदस्य हणमंत निराणी, युवा पर्यावरण आणि क्रीडा विभागाचे उपसंचालक जिनेश्वर पडनाड, बेळगाव जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनचे सचिव अशोक शिंदे, आरएलएस महाविद्यालयाचे निवृत्त संचालक जी. एन. पाटील, हिरक महोत्सवी  क्रीडा समितीचे अध्यक्ष  शरद पाटील, श्री विनोद दोड्डणावर, डॉ. सावित्री दोड्डणावर, भरतेश एज्युकेशन ट्रस्टच्या सर्व संस्थांचे  प्राचार्य, ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपचे अधिकारी, निमंत्रित पत्रकार आणि  माध्यम प्रतिनिधी यांच्यासह स्टॅंडर्ड ट्रॅक स्पोर्ट्सचे सर्व सदस्य उपस्थित होते.