सुळगा (हिं.) / वार्ताहर

आमदार झाल्यापासून सर्व घटकांना विश्वासात घेऊन हजारो कोटींचे अनुदान आणून मी प्रत्येक गावात विकास कामे सुरू केली आहेत. त्याचप्रमाणे आमदार म्हणून बेळगाव ग्रामीण मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करताना कसलाही भेदभाव न करता मी सर्वांच्या उत्कर्षासाठी प्रयत्न केले आहेत आणि यापुढेही तत्पर असल्याचे प्रतिपादन आ. लक्ष्मी हेब्बाळकर यांनी केले. बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील सांबरा गावात महिलांसाठी आयोजित केलेल्या हळदी-कुंकू कार्यक्रमाचे उद्घाटन करून त्या बोलत होत्या.

पुढे लक्ष्मी हेब्बाळकर म्हणाल्या, स्थानिक महिलांकडून हळदी-कुंकू घेणे आणि भारतीयांच्या महान वारशाचे दर्शन घडविणाऱ्या तसेच ऋणानुबंध निर्माण करणाऱ्या हळदी-कुंकू कार्यक्रमात सहभागी होणे हे आपले भाग्य असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी गावातील नागरिकांतर्फे आ. हेब्बाळकर आणि विधान परिषद सदस्य चन्नराज हट्टीहोळी यांचा भव्य तिरंगी पुष्पहार घालून सत्कार करण्यात आला.

यावेळी माजी जि. पं. सदस्य नागेश देसाई, इराप्पा सुळेभावी, सदाशिव पाटील, श्वेता बोम्मनवाडी, धनश्री चौगुले, पद्मश्री पुजेरी, आशा मोरे, शांता देसाई, सुलोचना जोगाणी, शकीला बागेवाडी, महेंद्र, भावकाण्णा बसरीकट्टी, महेश कुलकर्णी, रफिक अत्तार, वासुदेव पाटील, एकनाथ सनदी, लक्ष्मण सुळेभावी यांच्यासह गावातील महिला व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.