बेळगाव / प्रतिनिधी

जागतिक एड्स दिनानिमित्त एड्स संदर्भात जागृती करण्याच्या उद्देशाने बेळगाव शहरात जागृती रॅली काढण्यात आली. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश कोणी यांनी या रॅलीला हिरवा झेंडा दाखवून चालना दिली.

१ डिसेंबर हा दिवस जागतिक एस दिन म्हणून ओळखला जातो. या दिनानिमित्त जिल्हा प्रशासन, जिल्हा आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाच्या वतीने, जिल्हा एड्स प्रतिबंध आणि एड्स नियंत्रण विभागातर्फे, विविध सामाजिक संस्था आणि एनजीओच्या सहकार्याने रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश कोणी म्हणाले, एड्स बद्दल जागृती करण्याबरोबरच, एड्सग्रस्तांचे मनोबल वाढवणे, एड्स बाधित मृतांना श्रद्धांजली वाहणे हा या रॅलीचा उद्देश आहे. एड्स बद्दल लोकांमध्ये बरीचशी जागृती झाल्याने आता एड्सग्रस्त रुग्णांची टक्केवारी 0.9 वरून 0.5 इतकी झाल्याची माहिती त्यांनी दिली.

रॅली दरम्यान विविध कलापथकांनी आपल्या कला प्रदर्शनाद्वारे  जागृती केली. या रॅलीत बीम्स कॉलेजसह विविध नर्सिंग कॉलेजचे विद्यार्थी- विद्यार्थिनी, आशा कार्यकर्त्या, एनसीसी कॅडेट्स सहभागी झाले होते. जिल्हाधिकारी कार्यालयापासून सुरू झालेल्या रॅलीची बीम्स हॉस्पिटलच्या आवारात सांगता करण्यात आली.