बेळगाव / प्रतिनिधी

सर्वोच्च न्यायालयात सीमाप्रश्नाची सुनावणी सुरू असताना कर्नाटकातील काही मंत्र्यांकडून सातत्याने होणाऱ्या वादग्रस्त विधानांमुळे सीमावाद उफाळून आला. परिणामी सीमाभागात कन्नडिगांनी  महाराष्ट्र पासिंगची  वाहने आणि बसेसची केलेली तोडफोड आणि प्रत्युत्तरादाखल महाराष्ट्रात मराठी भाषिकांनी कर्नाटक परिवहनच्या बसेसचे केलेले नुकसान यामुळे दोन्ही राज्यांच्या परिवहन मंडळांसह जनता भरडली गेली. 

एकंदर परिस्थिती लक्षात घेता सरकारी वाहनांचे नुकसान टाळण्यासाठी दोन्ही राज्याच्या परिवहन मंडळांनी आंतरराज्य बससेवा बंद केली होती. तेव्हापासून महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांच्या बसेस सीमेपर्यंत धावत होत्या. त्यामुळे एकीकडे व्यावसायिक, नोकरदार आणि प्रवाशांची गैरसोय सुरु होती तर खासगी वाहनधारक प्रवाशांकडून जादा प्रवास भाडे आकारत होते. ही बाब लक्षात येताच दोन्ही राज्यांच्या परिवहन मंडळानी आजपासून पुन्हा बस सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला. यानुसार आज सकाळी बेळगावहून पुण्याकडे पहिली बस रवाना झाली. त्यानंतर लगेच कोल्हापूर येथूनही कर्नाटककडे पहिली बस मार्गस्थ झाली. त्यामुळे महाराष्ट्रातून कर्नाटकात ये-जा करणाऱ्या सीमा भागातील प्रवाशांना दिलासा मिळाला.

दोन्ही परिवहन मंडळांची चंदगड तालुका,कोकणातील बससेवा अद्यापही सीमेपर्यंतच 

बेळगावच्या सीमेनजीक असलेला चंदगड तालुका आणि कोकणच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातून बेळगावकडे येणाऱ्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळाच्या बसेस  अद्यापही महाराष्ट्रातील कर्नाटक राज्याच्या सीमेवरील शिनोळी (ता. चंदगड) गावापर्यंत धावत आहेत. तर कर्नाटक परिवहनच्या चंदगड तालुका तसेच कोकणातील बससेवेबद्दल अजून  कोणतीही अधिकृत माहिती प्राप्त झालेली नाही. तरी या भागातील बससेवाही लवकरात लवकर पूर्ववत व्हावी अशी मागणी  सीमाभागातील जनतेतून होत आहे.