बेळगाव / प्रतिनिधी
बेळगाव शहराचा स्मार्टसिटी योजनेत समावेश झाल्यापासून केंद्र आणि राज्य सरकारच्या संयुक्त अनुदानातून अनेक विकास कामे राबविली जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून आज बसवेश्वर सर्कल गोवावेस येथे शहरातील पहिल्या अंडरग्राउंड डस्टबिनचे आमदार अभय पाटील यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले.
या ठिकाणी फुटपाथनजिक चौकोनी आकारात झाकण असलेले कचराकुंड बसविण्यात आले आहे. कचऱ्याने भरलेले कोंडा क्रेनच्या साह्याने वर उडून कचरा गाडीत पोचण्याची सोय यामध्ये करण्यात आली आहे. यावेळी त्याचे प्रात्यक्षिक दाखविण्यात आले. महानगरपालिका अधिकाऱ्यांनी आ. अभय पाटील यांना या प्रकल्पाची तांत्रिक माहिती दिली.
यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना आमदार अभय पाटील म्हणाले, सदर अंडरग्राउंड डस्टबिन विथ सेन्सर हायड्रोलिक ऑपरेटेड व्हेईकल प्रकल्प संपूर्ण भारतातील पहिला अनोखा उपक्रम आहे. यामध्ये 70 टक्के कचरा भरल्यानंतर संबंधित कचरा संकलन वाहनाचे चालक व कर्मचारी, अधिकारी आणि स्थानिक नगरसेवकांना मेसेज जातो, त्यानंतर 90% कचरा भरल्यानंतर पुन्हा एकदा मेसेज जातो. शंभर टक्के कचरा भरल्यावर मेसेज जाऊन कचरा उचल न केल्याबद्दल संबंधित कर्मचाऱ्यांना दंड करण्याची ही तरतूद आहे.
बेळगाव शहरात कचऱ्याचे 120 ब्लॅक स्पॉट आहेत. लवकरच त्या सर्व ठिकाणी असे अंडरग्राउंड डस्टबिन बसविण्यात येणार आहेत. सध्या प्रायोगिक तत्त्वावर शहरातील 18 ठिकाणी ते बसविण्यात येणार आहेत. शहर स्वच्छ सुंदर व कचरामुक्त करण्यासाठी महापालिकेतर्फे आम्ही हा प्रकल्प राबवत आहोत. तेव्हा जनतेने ही डस्टबिनमध्ये कचरा टाकावा आणि शहर सुंदर ठेवण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी महापालिका आयुक्त रुद्रेश घाळी, महापालिका पर्यावरण अधिकारी कलादगी, नगरसेवक गिरीश धोंगडी, नितीन जाधव आणि जोशी सारिका पाटील, अन्य नगरसेवक यांच्यासह पालिकेचे अधिकारी उपस्थित होते.
0 Comments