महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील सीमाप्रश्नामुळे निर्माण झालेला वाद निवळण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी बैठक घेऊन काही तास उलटत नाहीत तोपर्यंत उद्या शुक्रवार दि. 16 डिसेंबर रोजी बेळगावच्या सीमेवरील कोल्हापूर जिल्ह्याच्या चंदगड तालुक्यातील शिनोळी गावात जाणार असल्याचे मंत्री शंभूराज देसाई यांनी जाहीर केले आहे.
शंभूराज देसाई बेळगावमध्ये न जाता बेळगाव सीमेवरच्या शिनोळी (बुद्रुक) गावात जाणार आहेत. त्यामुळे एकमेकांच्या सीमांचे उल्लंघन करायचे नाही हा अमित शाहांनी घालून दिलेला नियम ते पाळणार आहेत. पण त्यांच्या या दौऱ्यामुळे सीमाभागातील वातावरण पुन्हा तापणार आहे.
जोपर्यंत सर्वोच्च न्यायालयाचा निकाल लागत नाही तोपर्यंत एकमेकांच्या प्रदेशावर दावे करायचे नाहीत, असे अमित शाहांसोबतच्या बैठकीत दोन्ही राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी मान्य केले आहे. मग वर्षानुवर्षं महाराष्ट्राने केलेल्या बेळगाव आणि परिसराच्या मागणीचं काय? याच प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी शंभूराज देसाई बेळगाव सीमेवरील गावात जात आहेत. अर्थात मराठी भाषिकांना आधार देण्यासाठी आपण चाललो असल्याचे शंभूराज देसाई यांनी स्पष्ट केले आहे. पण त्यांच्या या जाण्याला भाजपाची संमती आहे का हे पाहावे लागेल. कारण शंभूराज देसाईंच्या या दौऱ्यावर कर्नाटकाकडूनही प्रतिक्रिया येण्याची शक्यता आहे.
0 Comments