- शाळा,कॉलेज,सिनेमागृह,पब अन् बारमध्ये मास्कसक्ती
- नववर्षाच्या स्वागतासाठीही नियमावली ;जल्लोष रात्री एक पर्यंतच
संपूर्ण राज्यात आजपासून कडक कोविड नियमावली लागू करण्यात आली आहे. त्यानुसार शाळा-महाविद्यालयात मास्क सक्तीचा असणार आहे. यंदा नववर्ष स्वागताचा जल्लोष मध्यरात्री एक वाजेपर्यंतच करता येणार आहे. सुर्वणसौधमध्ये आज दुपारी झालेल्या मंत्रिमंडळ कोविड बैठकीत हे निर्णय घेण्यात आले. कोविडच्या नव्या व्हेरिएंटच्या पार्श्वभूमीवर विधानसौधमध्ये आज मंत्रिमंडळाची बैठक आयोजित करण्यात आली होती. बैठकीनंतर महसूल मंत्री आर. अशोक यांनी प्रसारमाध्यमांना निर्णयांची माहिती दिली.
कोविडची नवी लाट चीनमध्ये आणि इतर देशांमध्ये कोविड वाढत आहे. या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय प्रवाशांवर अधिक लक्ष ठेवले जात आहे. संभाव्य गरज लक्षात घेऊन बंगळुर, मंगळुरू विशेष इस्पितळे राखीव ठेवण्यात आली आहेत. गर्दीच्या ठिकाणी खासकरून शाळा-कॉलेज वर्गात, सिनेमा थिएटरमध्ये मास्क, सॅनिटायझर अनिवार्य केले आहे असे मंत्री अशोक यांनी सांगितले.नवीन वर्षाच्या सेलिब्रेशनबाबत आरोग्यमंत्री डॉ. सुधाकर मुख्यमंत्र्यांशी बोलले आहेत. ३१ डिसेंबरच्या मध्यरात्री एक वाजेपर्यंतच न्यू ईयर सेलिब्रेशन करता येईल. या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली समिती स्थापन करण्यात आली आहे.
हॉटेल, बार, पबमध्ये ग्राहक, पुरवठादार या सगळ्यांनी कोविड प्रतिबंधक लसीचे दोन डोस घेतलेले असणे बंधनकारक आहे. जेवढे टेबल आणि खुर्च्या आहेत तेवढ्याच ग्राहकांना परवानगी आहे. रस्त्यावर सेलिब्रेशन करणाऱ्यांनी मास्क घालणे सक्तीचे आहे. रात्री एक वाजण्याच्या आत सर्व काही संपवून प्रत्येकाने आपापल्या घरी जावे. या नियमांबाबत आम्ही मुख्यमंत्र्यांशी बोललो आहोत. पोलिसांनाही आम्ही कळवू. हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, बार, पब एक वाजल्यानंतर बंद राहतील. हे नियम केवळ नववर्ष स्वागतासाठी लागू असतील. नवीन वर्षासाठी नवीन मार्गदर्शक तत्त्वे लागू होतील असे आ. अशोक यांनी स्पष्ट केले.प्रत्येक हॉस्पिटलमध्ये आयसीयू, ऑक्सिजन यंत्रणा सज्ज ठेवली पाहिजे. शाळा-महाविद्यालयांमध्ये स्वच्छता राखणे, मुलांनी मास्क घालणे सक्तीचे करण्याबाबत शाळा-महाविद्यालयांना देण्याच्या सूचना देण्यात येतील. बेंगळुरमध्ये बौरिंग, मंगळुरमध्ये व्हॅनिला हॉस्पिटलमध्ये आयसोलेशन सेंटरची व्यवस्था केली जाईल असेच मंत्री अशोक यांनी सांगितले.
0 Comments