- मराठी भाषिकांवर कर्नाटककडून होणाऱ्या अन्याय, अत्याचाराकडे वेधले लक्ष
- म. ए. समितीच्या आंदोलनाला सर्व पक्षीयांनी दिला पाठिंबा
कोल्हापूर / प्रतिनिधी
बेळगाव सीमाभागात मराठी भाषिकांवर होत असलेल्या अन्याय, अत्याचाराविरोधात महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने कोल्हापुर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाला कोल्हापुरातील सर्वपक्षीयांनी पाठिंबा देत सीमावासियांना मोठा आधार दिला. दरम्यान, जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांना निवेदन देत सीमावासीयांनी आपल्या व्यथा मांडल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांनी या प्रकरणात मध्यस्थी करून कर्नाटक सरकारला कडक शब्दांत समज द्यावी, अशी मागणी करण्यात आली.
बेळगावमधील कर्नाटक विधीमंडळाच्या अधिवेशनाला विरोध करण्यासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या महामेळाव्याला कर्नाटक सरकारने परवानगी नाकारली. पोलिसांनी नेते आणि कार्यकर्त्यांना अटक करत दडपशाही केली. या पार्श्वभूमीवर याचा निषेध नोंदवण्यासाठी बेळगाव येथील महाराष्ट्र एकीकरण समितीने कोल्हापुरात धरणे आंदोलन केले.
- समितीच्या कार्यकर्त्यांचे स्वागत -
सकाळी या धरणे आंदोलनासाठी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शेकडो कार्यकर्त्यांचे सर्वप्रथम कागलमध्ये आगमन झाल्यानंतर त्यांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर रॅलीने हे सर्व कार्यकर्ते कोल्हापुरात दाखल झाले. यावेळी कोल्हापुरातील सर्वपक्षीयांनी पाठिंबा दर्शवत ह्या आंदोलनात सहभाग घेतला.
- जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांना निवेदन-
दरम्यान, कोल्हापुरातील दसरा चौकात महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्याला वंदन केले. त्यानंतर दसरा चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत मोर्चा काढण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करत बेळगाव सीमा भागातील मराठी भाषिकांवर कर्नाटक सरकारकडून होणाऱ्या अन्याय अत्याचारकडे सीमावासियांनी जिल्हाधिकाऱ्यांचे लक्ष वेधले. याबाबत जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांना निवेदन देण्यात आले.
- सीमावासियांच्या पाठीशी आहोत हे कर्नाटकला दाखवून द्या ! -
महाराष्ट्र सरकारने एक दिवस महाराष्ट्र बंद करुन आपण सीमावासियांच्या पाठिशी आहोत, असे कर्नाटक सरकारला दाखवून द्यावे, असे आवाहनही यावेळी महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांनी या धरणे आंदोलना दरम्यान केले. या मोर्चात सर्वपक्षीयांसह नागरिकांनी नोंदवलेला सहभाग लक्षणीय होता.
0 Comments