- बेळगाव बार असोसिएशनची मागणी
- रास्तारोकोसह तीव्र आंदोलन करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
बेळगाव / प्रतिनिधी
कर्नाटकात गेल्या कित्येक वर्षांपासून वकील संरक्षण कायदा लागू करण्याची मागणी आहे. बेळगावमध्ये येत्या १९ डिसेंबर पासून सुरू होणाऱ्या कर्नाटक विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनात वकील संरक्षण कायदा मंजूर करण्याच्या मागणीसाठी आज शुक्रवारी, बेळगाव बार असोसिएशनने रास्तारोको करून तीव्र आंदोलन केले.
प्रारंभी बेळगाव बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. प्रभू यत्नट्टी, उपाध्यक्ष ॲड. सुधीर चव्हाण, ॲड.सचिन शिवण्णावर यांच्यासह जेष्ठ वकिलांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी वकील संरक्षण कायदा लागू करण्याच्या मागणीचे मुख्यमंत्र्यांच्या नावे असलेले निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर करण्यात आले.
यावेळी माध्यमांशी बोलताना बेळगाव बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड. प्रभू यत्नट्टी म्हणाले, गेल्या कित्येक वर्षांपासून राज्यभरातील आम्ही सर्व वकील संरक्षण कायदा लागू करावा यासाठी आंदोलने आणि निदर्शने करीत आहोत. वकिलांवरील हल्ल्यांचे प्रमाण वाढले असतानाच जनतेतूनही वकिलांवर अन्याय होत आहे. वकिलांना संरक्षण मिळण्याच्या दृष्टिकोनातून वकील संरक्षण कायदा महत्त्वाचा आहे. मात्र सरकार या कायद्याच्या अंमलबजावणीकडे दुर्लक्ष करत आहे. त्यामुळे येत्या 19 डिसेंबर पासून बेळगाव येथे होणाऱ्या कर्नाटक विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात हा कायदा संमत करावा अशी मागणी त्यांनी केली.
या आंदोलनात बेळगाव बारसोसिएशनचे पदाधिकारी आणि वकील मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
0 Comments