- सुवर्ण विधानसौधनजीक वकील संघटनेची निदर्शने
- विधानसौधला घेराव घालण्याचा केला प्रयत्न
- कायदामंत्री मधुस्वामी यांच्यावरही टीका
बेळगाव / प्रतिनिधी
वकील संरक्षण विधेयक मंजूर करण्याच्या मागणीसाठी वकील संघटनेतर्फे आज मंगळवारी बेळगाव सुवर्ण विधानसौधनजीक तीव्र आंदोलन करण्यात आले. यावेळी कायदामंत्री मधुस्वामी यांच्या विरोधात घोषणा देत वकिलांनी आपला रोष व्यक्त केला.
यावेळी आंदोलनकर्त्या वकिलांनी कायदामंत्री मधुस्वामी यांनी इथे येऊन आमचे म्हणणे ऐकून घ्यावे अशी मागणी केली. मात्र मंत्र्यांनी भेट न दिल्याने संतप्त झालेल्या वकिलांनी सुवर्ण विधानसौधला घेराव घेण्यात सुरुवात केली. पोलिसांनी रस्त्यावर बॅरीकेड्स लावून त्यांना रोखले. मात्र त्यांनी बॅरिकेट हटवले आणि शेजारच्या जमिनीतून जात सुवर्ण विधानसौधला घेराव घालण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, बेळगावचे शहर पोलीस आयुक्त एम. बी. बोरलिंगय्या आणि वकील संघटनेच्या नेत्यांमध्ये वादावादी झाली. तर दुसरीकडे पोलिसांनी आंदोलक वकिलांना दोरी लावून रोखण्याचा प्रयत्न केला. तेव्हा पोलिस आणि सरकार विरोधात घोषणा देत वकिलांनी रोष व्यक्त केला.
पोलीस आयुक्त बोरलिंगय्या यांनी आंदोलकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. मात्र संतप्त वकिलांनी सुवर्ण विधानसौधच्या गेटवर चढून मंत्री मधस्वामी यांच्या विरोधात जोरदार घोषणा दिल्या. यामुळे घटनास्थळी काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. यानंतर महसूल मंत्री आर. अशोक हे आंदोलन स्थळी पोहोचले.पोलीस आणि वकिलांवर सातत्याने हल्ले होत आहेत तेव्हा वकील संरक्षण कायदा लागू करण्याची मागणी केली आहे. मुख्यमंत्री आणि कायदामंत्री यांनी ती मान्य केली असल्याचे सांगून मंत्री आर.अशोक यांनी वकिलांना आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
0 Comments