बेळगाव / प्रतिनिधी 

इंडो थायलंड येथील आंतरराष्ट्रीय सेस्टोबॉल स्पर्धेत सुवर्णपदक पटकावणाऱ्या मुला -मुलींच्या भारतीय संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या बेळगावच्या सेस्टोबॉल खेळाडूंचे बेळगाव रेल्वे स्थानकावर शहरवासीयांसह क्रीडाप्रेमींकडून उस्फुर्त स्वागत करण्यात आले.

थायलंड येथील आंतरराष्ट्रीय सेस्टोबॉल स्पर्धेत बेळगावच्या 6 खेळाडूंनी चमकदार कामगिरी नोंदवत सुवर्णपदक पटकाविले आहे. या खेळाडूंमध्ये तीन मुलं आणि तीन मुलींचा समावेश असून त्यांची नावे रविराज नाईक, ओमकार गुरव, शुभम यादव, नम्रता कामू, श्रेया गोणी व आदिती बालिगा अशी आहेत. हे खेळाडू स्पर्धा आटपून नुकतेच बेळगावला परतले त्यांचे बेळगाव रेल्वे स्थानकावर आप्तस्वकीयांसह क्रीडाप्रेमी शहरवासीयांकडून उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. सेस्टोबॉल हा क्रीडा प्रकार नेटबॉल क्रीडा प्रकाराशी साधर्म्य साधणारा असून जो 19 व्या शतकात अर्जेंटीनामध्ये उदयास आला. सहा खेळाडूंचा समावेश असणाऱ्या दोन संघांमध्ये 20 मिनिटासाठी या सेस्टोबॉल खेळाचा सामना खेळविला जातो. आंतरराष्ट्रीय स्पर्धेतील यशाबद्दल उपरोक्त सहा सेस्टोबॉल खेळाडूंचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.