- बेळगावसह सीमाभागात तीव्र आंदोलने
- मराठी भाषिकांमध्ये संतापाची लाट
- कर्नाटक सरकारच्या हुकूमशाहीचा नोंदविला निषेध
- महाराष्ट्र - कर्नाटक सीमेला छावणीचे स्वरूप
- महाराष्ट्र विधिमंडळातही उमटले बेळगावचे पडसाद
- म. ए. समितीच्या नेत्यांना अटक आणि सुटका
- महाराष्ट्र राज्यसरकार सीमा वासियांच्या पाठीशी खंबीरपणे उभे
- मेळाव्याला परवानगी नाकारल्याबद्दल कर्नाटक सरकारला विचारणार जाब
- महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ग्वाही
बेळगावमध्ये महाराष्ट्र एकीकरण समितीने आयोजित केलेल्या मराठी भाषिकांच्या महामेळाव्याला परवानगी नाकारून समिती नेते आणि कार्यकर्त्यांची धरपकड करत त्यांना स्थानबद्ध केल्याच्या पार्श्वभूमीवर बेळगावसह सीमाभागात मराठीभाषिकांनी तीव्र निदर्शनांसह कर्नाटक सरकारच्या हुकुमशाहीचा निषेध नोंदवला.
कर्नाटक विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला प्रत्युत्तर देण्यासाठी दरवर्षीप्रमाणे महाराष्ट्रात जाण्याची तीव्र इच्छा प्रकट करण्यासाठी यंदाही महाराष्ट्र एकीकरण समितीने शहरातील व्हॅक्सिन डेपो मैदानावर महामेळाव्याचे आयोजन केले होते. मात्र बेळगाव जिल्हा प्रशासनाने मेळाव्याच्या ठिकाणी १४४ कलम व जमावबंदीचा आदेश लागू केल्याने, अखेर हा मेळावा रद्द झाला. एवढ्यावरच न थांबता मराठी भाषिकांचा पोटशूळ उठलेल्या कर्नाटक पोलिसांनी समिती नेते आणि कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन स्थानबद्ध केले. यामुळे बेळगावच्या सीमाभागातील वातावरण चांगलेच तापले होते.
माजी आमदार मनोहर किणेकर आणि म. ए. समितीच्या महिला पदाधिकाऱ्यांचेही आंदोलन
महामेळाच्या ठिकाणी व्हॅक्सिन डेपो परिसरात १४४ कलम व जमावबंदी लागू करून समितीचे नेते, कार्यकर्ते तसेच महिला पदाधिकाऱ्यांसह महिला कार्यकर्त्यांना मोठ्या प्रमाणात ताब्यात घेण्यात आल्याने माजी आमदार तथा मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष मनोहर किणेकर यांनी अटक केल्यानंतर कार्यकर्त्यांसएपीएमसी पोलीस स्थानकातच अन्नत्याग आंदोलन सुरु केले. याशिवाय माजी महापौर सरिता पाटील, माजी उपमहापौर रेणू किल्लेकर, शिवानी पाटील यांच्यासह महिला कार्यकर्त्यांनी स्थानबद्ध करण्यात आलेल्या कॅम्प महिला पोलीस स्थानकात समिती नेत्यांनी मराठी भाषिकांच्या अटकेचा निषेध नोंदविला.
व्हिडिओ पहा 👇
तर भवानीनगर येथे तालुका समितीच्या शेकडो कार्यकर्त्यांनी त्याचप्रमाणे कंग्राळी खुर्द येथे माजी जि. पं. सदस्या सरस्वती पाटील यांनी तर मराठा कॉलनीत खानापूर समितीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले.
व्हिडिओ पहा 👇
कोगनोळी चेकपोस्टवर महाविकास आघाडीचे आंदोलन
शेकडो कार्यकर्त्यांचा बेळगावच्या हद्दीत घुसण्याचा प्रयत्न
महाराष्ट्र एकीकरण समितीच्या महामेळाव्याला परवानगी नाकारून समितीने नेते,कार्यकर्ते आणि मराठी भाषिकांची धरपकड झाल्याचे समजताच, कोल्हापूर येथून महाविकास आघाडीचे नेते आणि कार्यकर्त्यांनी बेळगावच्या अधिक घोषणाचा प्रयत्न केला. निपाणी तालुक्यातील कोगनोळी चेक पोस्टवर शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे शेकडो कार्यकर्ते आपल्या पक्षांचे झेंडे हाती घेऊन दाखल झाले होते.
यावेळी बेळगाव,कारवार, निपाणी बिदर भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. कोगनोळी चेक पोस्टच्या दोन्ही बाजूला एकीकडे महाराष्ट्र तर दुसरीकडे कर्नाटक पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त होता. हे कार्यकर्ते आक्रमक होण्याआधी त्यांच्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू होते. मात्र तरी देखील हे कार्यकर्ते बेळगावच्या हद्दीमध्ये शिरण्याचा प्रयत्न करत होते. या आंदोलनामुळे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४ वर वाहतूक कोंडी झाली होती.
आमदारावरच हल्ला होतो, तर मग बेळगावातील मराठी भाषिकांवर किती अत्याचार होत असतील
आमदार हसन मुश्रीफ यांच्याकडून कर्नाटक सरकारच्या दडपशाहीचा निषेध
पोलिसांनी अडविल्याने राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ त्यांनी कर्नाटक- महाराष्ट्र सीमेवरील दूधगंगा नदीच्या पुलावर उभे राहून भाषण केले. जर कर्नाटक पोलिसांकडून आमदारावरच हल्ला होत असेल तर मग बेळगावातील मराठी भाषिकांवर किती अन्याय, अत्याचार होत असतील असा संतप्त सवाल करत माजी मंत्री व आमदार हसन मुश्रीफ यांनी कर्नाटक सरकारच्या दडपशाहीचा निषेध केला. शांततेने बेळगावच्या दिशेने जात असताना कोगनोळी टोल नाक्यावरच कर्नाटक पोलिसांकडून आम्हाला अडविण्यात आले तसेच आमच्यावर लाठी हल्ला करण्यात आल्याचेही आमदार हसन मुश्रीफ यांनी सांगितले. कर्नाटकचा सीमाभाग महाराष्ट्रात सामील झाला पाहिजे, कर्नाटकातील सीमा भागात मराठी बांधवांवर होणारे अत्याचार आम्ही सहन करणार नाही, महाराष्ट्र सदैव त्यांच्या पाठीशी आहे असेही ते म्हणाले. महाविकास आघाडीच्या ५०० हून अधिक कार्यकर्त्यांनी यावेळी कर्नाटक आणि महाराष्ट्र सरकारच्या विरोधात घोषणा देत आपला संताप व्यक्त केला.
दडपशाहीचा...शिनोळीत निषेध ! तब्बल दोन तासाहून अधिक काळ रास्तारोको आंदोलन
धिक्कार असो धिक्कार असो कर्नाटक सरकारचा धिक्कार असो, अशा घोषणा देत मराठी भाषिकांसह सर्वपक्षीय नेत्यांनी जुलमी कर्नाटक सरकारने अटक केलेल्या नेत्यांना सोडल्याशिवाय येथून हटणार नाही अशी आक्रमक भूमिका घेऊन आंदोलनाचा पवित्रा घेतल्याने बेळगाव वेंगुर्ला मार्गावर रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. बेळगावमध्ये होत असलेल्या कर्नाटक सरकारच्या हिवाळी अधिवेशना दिवशीचं महाराष्ट्र एकीकरण समितीने आयोजित केलेल्या महामेळाव्याला परवानगी नाकारून नेते मंडळींना अटक केल्याचा निषेध यावेळी करण्यात आला.
राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी विधानसभेत मांडला बेळगावचा मुद्दा
व्हिडिओ पहा 👇
मेळाव्याला परवानगी नाकारल्याबद्दल जाब विचारणार ; देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य
या देशात लोकशाही पद्धतीने आंदोलन करण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. त्यामुळे महाराष्ट्र एकीकरण समितीच्या महामेळाव्याला ऐनवेळी परवानगी का नाकारली? यासंदर्भात कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना जाब विचारला जाईल असे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले आहे.
नागपूर येथे बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, सीमा भागातील आमच्या मराठी बांधवांच्या पाठीशी महाराष्ट्र सरकार खंबीरपणे उभे आहे. आतापर्यंत केंद्र सरकार या प्रश्नात कधीच हस्तक्षेप करत नव्हते. मात्र पहिल्यांदाच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बैठक घेत दोन्ही बाजू ऐकून घेतल्या. त्यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एकदम स्पष्ट भूमिका मांडली आहे. त्यामुळे समितीच्या महामेळायला ऐनवेळी परवानगी का नाकारली? यासंदर्भात कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्यात येणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
अटक केलेल्या समितीने नेत्यांची अखेर सुटका
दरम्यान जुलमी कर्नाटक सरकारच्या दडपशाहीचा निषेध नोंदवणाऱ्या म. ए. समितीच्या अटक करून स्थानबद्ध करण्यात आलेल्या नेत्यांची सायंकाळी सुटका करण्यात आली. सुटका होताच समिती नेते व कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणा दिल्या तसेच माध्यमांना आपल्या प्रतिक्रिया दिल्या.
व्हिडिओ पहा 👇
व्हिडिओ पहा 👇
एकंदरीतच मराठीभाषेचा पोटशूळ उठलेल्या कर्नाटक सरकारने हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र एकीकरण समितीच्या महामेळाव्याला परवानगी नाकारून मराठी भाषिकांसह समिती नेते व पदाधिकाऱ्यांना अटक केल्याचे तीव्र पडसाद सीमा भागात उमटल्याचे पाहायला मिळाले.
0 Comments