• बेळगाव जिल्हा पोलिसांची वर्षभरात मोठी कामगिरी 
  • पोलीस महानिरीक्षक सतीश कुमार यांची पत्रकार परिषदेत माहिती


बेळगाव / प्रतिनिधी

सन २०२२ मध्ये चोरी, घरफोडी तसेच फसवणूक अशा विविध गुन्ह्यांचा बेळगाव जिल्हा पोलिसांनी यशस्वी तपास करून कोट्यावधींचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी  ३२४ आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती बेळगाव उत्तर विभागाचे पोलीस महानिरीक्षक सतीश कुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली.

या पत्रकार परिषदेत पुढे पोलीस महानिरीक्षक सतीश कुमार यांनी , सन २०२२ मध्ये पोलिसांनी छडा लावलेल्या प्रकरणांसह जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची, सविस्तर माहिती दिली. बेळगाव जिल्हा पोलिसांनी उत्तम कामगिरी करून मोठ्या प्रमाणात गुन्ह्यांचा यशस्वी तपास करत जनतेचा विश्वास संपादित केला आहे. या शब्दात त्यांनी बेळगाव जिल्हा पोलिसांचे कौतुक केले.

बदलत्या तंत्रज्ञानात नवनवीन आव्हानांना सामोरे जात पोलीस तपास करत आहेत. विभागाकडून पोलिसांनाआधुनिक तंत्रज्ञानाची माहिती देऊन  त्यांना प्रशिक्षण देण्याचे काम सुरू आहे असेही ते म्हणाले.


एका वर्षात पोलिसांनी ३०१ गुन्हे उघडकीस आणले असून 324 आरोपीना अटक करण्यात आली आहे . एकूण 17 कोटी 54 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे . या प्रकरणांमध्ये 4 कोटी 18 लाख , किमतीचे आठ किलो 369 ग्रॅम सोने , 4 लाख 91 हजार किमतीची 7 किलो चांदी , 1 कोटी 24 लाख रु . किमतीच्या दुचाकी , 3 कोटी 99 लाख रु . किमतीची 24 मोटार वाहने जप्त करण्यात आली आहेत .त्याच प्रमाणे , 7 कोटी ४७ लाखांची रोकड ,59 लाख रु. किमतीचे मोबाईल व इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. बेळगाव मधील डी. आर. मैदान येथे या जप्त केलेल्या मुद्देमालाचे पोलीस खात्याकडून प्रदर्शन भरवण्यात आले असून, मूळ मालकांना त्यांचे दागिने आणि वस्तू हस्तांतरित करण्यात येणार असल्याची माहिती एस पी संजीव पाटील यांनी दिली .

प्रत्येक पोलीस स्थानकानुसार त्यांनी जप्त केलेला मुद्देमाल प्रदर्शनात मांडण्यात आला होता. यानंतर मूळ मालकांना त्यांनी दिलेल्या पुराव्यानुसार त्यांचे दागिने आणि वस्तू हस्तांतरित करण्यात आल्या.


ऑक्टोबर महिन्यात शिरगुप्पी येथील  सुनीता बुवा नामक महिलेच्या घरी चोरी झाली होती. परंतु बेळगाव जिल्हा पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावून आमच्या घरातून चोरीला गेलेल्या सोन्याच्या वस्तू परत मिळवून दिल्याबद्दल सदर महिलेने पोलिसांचे आभार मानले.  त्याचप्रमाणे आपले सोन्याचांदीचे दागिने परत मिळालेल्या लोकांनी देखील पोलीस विभागाचे आभार मानले.

यावेळी एएसपी महानिंग नंदगावी यांच्यासहित , विविध पोलीस स्थानकाचे सीपीआय , पीएसआय , तसेच पोलीस कर्मचारी आणि , तक्रारदार व्यक्ती मोठ्या संख्येने उपस्थित होत्या .