बेळगाव / प्रतिनिधी 

नुकताच बाग परिवार,बेळगाव या साहित्यिक मंडळाचा काव्यवाचन हा कार्यक्रम गोवावेस सर्कल येथील बसवेश्वर गार्डन येथे मोठ्या उत्साहात पार पडला. पावसाच्या विश्रांतीनंतर बऱ्याच काळाने बागेत हा उपक्रम होत असल्याने सगळे उत्साही दिसत होते. सध्या लग्नसराई सुरू असल्याने थोडी उपस्थिती कमी असली तरी जे उपस्थीत होते त्यांनी कार्यक्रमाचा मनापासून आस्वाद घेतला.

सदर कार्यक्रमात मनिषा नाडगौडा- 'माझे गाव बेळगाव', रविंद्र ठाकुर देसाई -' पुरावा', चंद्रशेखर गायकवाड -' बघ आता तरी ओळख पटते काय?', निकीता भडकुंबे-' वृक्ष', अस्मिता आळतेकर-'एकांतात', अंजली देशपांडे -' निसर्ग आणि मी', शीतल पाटील-' हे गुलाबी थंडी',भरत गावडे-' व्यथा', दिलीप सावंत-' प्रश्न', स्मिता किल्लेकर-' हे देवाघरचे देणे ', अशा एकापेक्षा एक बहारदार,सुंदर कवितांचे सादरीकरण कवींनी केले. तर शिक्षिका अस्मिता देशपांडे यांनी नोहेंबर हा बालदिनाचा महिना असल्याने छोट्या बालकथेचे सुंदर सादरीकरण केले. गावरान भाषेतली ही ' गण्याची भन्नाट धमाल' कथा भाव खाऊन गेली.

कार्यक्रम संपताना नजीकच्या खाऊ कट्यावरील अल्पोपहार व चहापानाने अधिकच रंगत आणली.

सदर कार्यक्रमास संतोष वाटवे पत्रकार उपस्थित होते. त्यांनी या कार्यक्रमाचा आस्वाद घेऊन बाग परिवाराच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. मनिषा नाडगौडा, सुत्रसंचालन शीतल पाटील,व आभार प्रदर्शन रविंद्र ठाकुर देसाई यांनी केले.दिलीप सावंत यांनी कार्यक्रमाचा आढावा घेत लेखाजोगा सादर केला.