• दिनांक 18 रोजी आजरा येथे 'रास्ता रोको' करणार 

गडहिंग्लज / प्रतिनिधी

'संकेश्वर- बांदा महामार्ग बाधित शेतकरी संघटनेने आज महामार्गाचे काम बंद पाडले. दरम्यान, दिनांक 18 नोव्हेंबर रोजी आजरा येथे रास्ता रोको आंदोलन करण्याचा निर्णय यावेळी झालेल्या बैठकीत घेण्यात आला.

महामार्ग बाधित शेतकऱ्यांना त्यांच्या नुकसानीचे काय होणार असा प्रश्न आहे. रस्त्याच्या बाजूपट्टीची हद्दही शेतकऱ्यांच्या नावावर आहे. मात्र त्यांना नोटिसा न देता काम चालू केले आहे. शेतकऱ्यांच्या शेतातील कडेची झाडे तोडण्यात आली, मात्र याच मार्गावर वन खात्याच्या हद्दीतून रस्ता गेला आहे त्या हद्दीत मात्र वन खात्याने परवानगी न दिल्याने एकही झाड तोडले नसून त्यांच्या हद्दीतून बाजूपट्टीचे सफाईचे कामही अद्याप चालू नाही. 


या पार्श्वभूमीवर आज भादवण फाटा (ता.आजरा) येथे व्यापक बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान, बैठकीसाठी आलेल्या महामार्ग बाधित  शेतकऱ्यांनी  शिवाजी इंगळे, गणपती येसने व इतर पदाधिकारी यांच्या नेतृत्वाखाली महामार्गाचे काम बंद पाडले.

त्यानंतर महामार्ग बाधित शेतकऱ्यांची भादवण फाटा येथे बैठक पार पडली. या बैठकीत  दिनांक 18  रोजी आजरा येथे सकाळी 11 वाजता रास्ता रोको आंदोलन करण्याचे ठरले. आंदोलनाद्वारे शासनाचे लक्ष वेधले जाणार असल्याचे संघटनेचे अध्यक्ष कॉम्रेड शिवाजी गुरव यांनी सांगितले.

आजरा येथील 'बायपास कृती समिती' व 'संकेश्वर-बांदा महामार्ग शेतकरी संघटना' यांनी इथून पुढे एकत्रित लढा देण्याचे एकमताने या बैठकीत ठरविण्यात आले. यावेळी कॉ. शिवाजी गुरव, संजय तरडेकर, निवृत्ती कांबळे, जयवंत थोरवतकर यांनी मार्गदर्शन केले. 

या बैठकीस कॉम्रेड शिवाजी गुरव, कॉम्रेड संजय तरडेकर , गणपतराव डोंगरे, दत्तात्रय मोहिते, शिवाजी इंगळे, गणपतराव येसने, निवृत्ती कांबळे, दुंडगेचे उपसरपंच अण्णासो पाटील, धनगरमोळा सरपंच चंद्रकांत जाखले यांच्यासह जाधेवाडी,आजरा, मडिलगे, भादवण, धनगरमोळा, हिरलगे, खेडे यासह गडहिंग्लज तालुक्यातून शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.