खानापूर / प्रतिनिधी

खानापूर येथील लक्ष्मी मंदिरात आज 1 नोव्हेंबर काळ्या दिनानिमित्त  खानापूर तालुका म. ए. समितीच्या वतीने अध्यक्ष गोपाळराव देसाई यांच्या अध्यक्षतेखाली लाक्षणिक उपोषण व सभा घेण्यात आली. या सभेमध्ये मराठी भाषिकांनी आपल्या भावना व्यक्त करताना केंद्र शासनाचा तीव्र शब्दात निषेध केला.

या 1 नोव्हेंबर काळा दिनानिमित्त गेल्या पंधरा दिवसांपासून समितीच्या कार्यकर्त्यांनी तालुका मराठी भाषिक गावांमध्ये मोठ्या दमाने जनजागृती केली होती. यामुळे केंद्र शासनाचा निषेध करून आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी तालुक्यातील तरुण मंडळी व ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी समितीच्या नेत्यांनी केंद्र शासनाचा निषेध करत यापुढे मोठ्या जिद्दीने व लढाव वृत्तीने रस्त्यावरची लढाई लढली जाईल असे सांगून मराठी भाषिकांमध्ये उत्साह निर्माण केला.

यावेळी खानापूर समितीचे अध्यक्ष गोपाळराव देसाई यांनी केंद्र शासनाचा निषेध करून सीमा प्रश्नाचा निकाल लागेपर्यंत मराठी भाषिकांनी एकसंघ राहून होणाऱ्या अन्यायाला वाचा फोडली पाहिजे असे मत व्यक्त केले. या बैठकीला समितीचे ज्येष्ठ नेते देवाप्पण्णा गुरव, गोपाळराव पाटील, माजी सभापती सुरेशराव देसाई, संभाजी देसाई, युवा समितीचे अध्यक्ष धनंजय पाटील, सूर्याजी पाटील, यांच्यासह तीओली, नंदगड, शिरोली, गर्लगुंजी, खानापूर,हलसाल, माचीगड, चन्नेवाडी,तोपीनकट्टी अशा विविध गावांमधून मराठी भाषिक तरुण व ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते.