बेळगाव / प्रतिनिधी 

सीमाभागातील मराठी माणसाचे आधारस्तंभ शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना आज बेळगावात विनम्र अभिवादन करण्यात आले.

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज दहावा स्मृतिदिन.  १७ नोव्हेंबर २०१२ रोजी बाळासाहेब ठाकरे यांचे निधन झाले. या गोष्टीला आज दहा वर्षे उलटली तरी सीमाभागात बाळासाहेब ठाकरे यांची कमतरता अजूनही जाणवते आहे. बाळासाहेब ठाकरे यांच्या दहाव्या स्मृतिदिनानिमित्त बेळगावातील रामलिंगखिंड येथील शिवसेना कार्यालयात त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला शिवसेना सीमाभाग प्रमुख प्रकाश शिरोळकर, मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचे सरचिटणीस मालोजीराव अष्टेकर यांच्याहस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी उपस्थित शिवसैनिक आणि समिती कार्यकर्त्यांनी अमर रहे अमर रहे, बाळासाहेब ठाकरे अमर रहे’, ‘झिंदाबाद झिंदाबाद शिवसेना झिंदाबाद ‘, ‘बेळगाव, कारवार, खानापूर, निपाणी, बीदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजेअशा जोरदार घोषणा दिल्या.

यावेळी बोलताना मालोजीराव अष्टेकर यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या आठवणींना उजाळा दिला. बाळासाहेब ठाकरे हे देशातील हिंदूंचे तसेच सीमाभागातील मराठी माणसाचे आधारवड होते. सीमाभागातील निष्पाप मराठी माणसांवर अन्याय करणाऱ्या कर्नाटक सरकारला त्यांनी वारंवार ठणकावले होते. त्यामुळेच आज इतक्या वर्षांनंतरही कर्नाटक सरकारला आणि कानडी नेत्यांना जर कोणाचा धाक वाटत असेल तर तो बाळासाहेब ठाकरे यांचाच असे ते म्हणाले.

यावेळी म. . युवा समिती अध्यक्ष शुभम शेळके, शिवसेना नेते माजी नगरसेवक दिलीप बैलुरकर, मनोहर हलगेकर, राजकुमार बोकडे, प्रवीण तेजम, विकास कलघटगी, ऍड. हेमराज बेंचन्नावर यांच्यासह शिवसैनिक आणि म. . समिती कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.