• ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक राजेंद्र कलघटगी यांचे प्रतिपादन 
  • बेळगाव जिल्हा पोलीस दलाच्या  क्रीडा महोत्सवाला प्रारंभ

बेळगाव / प्रतिनिधी

सीमेवर कर्तव्य बजावणारे जवान शत्रूपासून देशाचे संरक्षण करतात त्याचप्रमाणे जीवनात येणाऱ्या  अडीअडचणींचा समर्थपणे सामना करत २४ तास कर्तव्य बजावणारे पोलीस जनतेचे रक्षण करतात. स्वतःच्या कुटुंबाची पर्वा न करता समाजासाठी काम करणाऱ्या पोलिसांचा मला अभिमान वाटतो असे प्रतिपादन ,ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक राजेंद्र कलघटगी यांनी केले .

बेळगाव शहरातील पोलीस परेड मैदानावर पोलीस आयुक्तालय, शहर व जिल्हा पोलीस विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या दोन दिवसीय क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासह प्रत्येक गोष्टीत पोलीस आघाडीवर असतात. वाहतूक समस्या देखील ते योग्यरीत्या सोडवतात असेही ते म्हणाले. स्वातंत्र्य लढ्यात इंग्रजांविरुद्ध लढत असताना पोलिसांनी आम्हाला अटक करून न्यायालयात हजर केले. शिक्षा भोगूनही आम्ही इंग्रजांविरुद्ध लढलो आणि स्वातंत्र्य मिळविण्यात यशस्वी झालो याचीही आठवण त्यांनी यावेळी करून दिली.

प्रारंभी राजेंद्र कलघटगी यांच्या हस्ते क्रीडा मशाल प्रज्वलित करून आणि रंगीबेरंगी फुगे हवेत सोडून क्रीडा स्पर्धांचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी पोलीस विभागाच्या कर्मचाऱ्यांनी केलेले आकर्षक पथसंचलन लक्षवेधी ठरले.

याप्रसंगी  बेळगाव शहर पोलीस आयुक्त डॉ. एम.बी. बोरलिंगय्या यांनी पोलीस दलासाठी क्रीडा स्पर्धेचे महत्त्व पटवून दिले. त्याचबरोबर स्पर्धेचे उद्घाटन केलेले ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक राजेंद्र कलघटगी यांच्याकडून आम्हाला प्रेरणा मिळते असे सांगितले.

या क्रीडा महोत्सवाच्या उद्घाटनाला जिल्हा पोलीस प्रमुख डॉ. संजीव पाटील, अतिरिक्त जिल्हा पोलीस प्रमुख महानिंग नंदगावी, शहर पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या, पोलीस उपायुक्त रवींद्र गडादी, पी. व्ही. स्नेहा आदी उपस्थित होते.

उद्या सायंकाळी 4:00 वाजता या क्रीडा महोत्सवाचा समारोप होणार असून या कार्यक्रमाला एमएलआरआयसीचे ब्रिगेडियर जयदीप मुखर्जी उपस्थित राहणार आहेत. यावेळी विजेत्या संघांना तसेच खेळाडूंना पारितोषिकांचे वितरण केले जाणार आहे.