• बेळगाव बार असोसिएशनची मागणी
  • जिल्हाधिकाऱ्यांमार्फत विधानसभा अध्यक्षांना निवेदन

बेळगाव / प्रतिनिधी

बेळगाव बार असोसिएशनने भाजपचे रामदुर्ग तालुक्याचे आमदार महादेवप्पा यादवाड यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे. मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करत जिल्हाधिकाऱ्यांमार्फत विधानसभा अध्यक्षांना या संदर्भात निवेदन देण्यात आले.

बटकुरकी (ता.रामदुर्ग) गावानजीक सोलापूर सिंचन कालव्याच्या भूमिपूजन समारंभात भाषणावेळी आमदार महादेवप्पा यादवाड यांनी वकिलांच्या प्रतिष्ठेला कलंक लावणारे वक्तव्य केले होते. हा संपूर्ण वकिली व्यवसायाचा अपमान आहे. यामुळे त्यांच्यावर तातडीने कारवाई करावी अशी मागणी या निवेदनात करण्यात आली आहे.

यावेळी बार असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष प्रभू यत्नट्टी म्हणाले, महादेवप्पा यादवाड हे एक जबाबदार आमदार असून वकिलांच्या विरोधात त्यांनी केलेले वक्तव्य अत्यंत चुकीचे आहे. म्हणून आमदारकी बरोबरच त्यांचे सदस्यत्व तात्काळ रद्द करण्याची मागणी त्यांनी केली.

यावेळी ॲड. सचिन शिवण्णावर, ॲड. सुधीर चव्हाण, ॲड. गिरीराज पाटील. ॲड. ए. टी.पाटील यांच्यासह बार असोसिएशनचे पदाधिकारी आणि इतर वकील उपस्थित होते.