बेळगाव / प्रतिनिधी
विठ्ठलदेव गल्ली शहापूर, बेळगाव येथील श्री विठ्ठल देवस्थानचा रथोत्सव मंगळवारी पार पडला. दरवर्षी कोजागिरी पौर्णिमेला श्री विठ्ठल मंदिरात काकड आरती प्रारंभ होते आणि त्याची सांगता त्रिपुरारी पौर्णिमेला होते. काकड आरतीची सांगता झाल्यावर दरवर्षी रथोत्सव साजरा करण्यात येतो. १६५२ पासून श्री विठ्ठल देवस्थानचा रथोत्सव दरवर्षी केला जातो.गेली ३७० वर्षे ही रथोत्सवाची परंपरा अविरतपणे सुरू आहे.
सकाळी श्री विठ्ठल मंदिरा पासून रथोत्सवाला मानकऱ्यांच्या उपस्थितीत प्रारंभ झाला. रथोत्सवाच्या मार्गावर ठिकठिकाणी सडा, रांगोळ्या घालून स्वागत करण्यात येत होते. रथात विराजमान झालेल्या विठुरायाची आरती करून श्रीफळ देखील वाढवण्यात येत होते. रथ ओढण्यासाठी महिला देखील भक्तिभावाने सहभागी झाल्या होत्या.विठ्ठलदेव गल्लीपासून प्रारंभ होऊन आचार्य गल्ली, गाडेमार्ग, सराफ गल्ली, खडेबाजार, कचेरी गल्ली, मिरापुर गल्ली आणि होसुर मार्गे रथ मंदिराकडे आल्यावर रथोत्सवाची सांगता झाली. रथोत्सव यशस्वी करण्यासाठी मंदार देऊळकर, वेदमूर्ती नागेशशास्त्री हेर्लेकर, अक्षय जोशी, विकास कुलकर्णी, संतोष चिकोर्डे, गणपतराव चिकोर्डे यांनी विशेष परिश्रम घेतले. यावेळी मानकरी आणि भक्तांची लक्षणीय उपस्थिती होती.
0 Comments