बेळगाव / प्रतिनिधी

बेळगाव तालुक्यातील शेकडो शेतकऱ्यांची सुपीक जमीन संपादित करून होऊ घातलेल्या रिंगरोड  विरोधातील न्यायालयीन लढाई अधिक तीव्र करण्याचा निर्धार तालुका म. ए. समितीने केला आहे.

शहरातील तुकाराम महाराज सांस्कृतिक भवन येथे झालेल्या बेळगाव तालुका म. ए. समितीच्या बैठकीत रिंगरोड विरोधात शेतकऱ्यांमधून आक्षेप मागवून आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. प्रस्तावित रिंगरोड साठी 31 गावातील सुपीक जमीन संपादित करण्यात येणार आहे. या भूसंपादनाला एकमुखी विरोध करण्याचेही ठरविण्यात आले.

यावेळी माजी आमदार मनोहर म्हणाले की, प्रस्तावित रिंगरोड मुळे अनेक शेतकरी भूमिहीन होणार आहेत. त्यात प्रामुख्याने मराठी भाषिक शेतकऱ्यांची संख्या जास्त आहे. हा अन्याय दूर करण्यासाठी सर्वांनी संघटितपणे लढा देण्याचे आवाहन त्यांनी केले.

यावेळी मध्यवर्ती म. ए. समितीचे सरचिटणीस मालोजीराव अष्टेकर, एस. एल. चौगुले, माजी महापौर शिवाजी सुंठकर, माजी जि. पं. सदस्या सरस्वती पाटील, संतोष मंडलिक आदींनी विचार मांडले. या बैठकीला म. ए. समितीचे कार्यकर्ते  आणि बेळगाव तालुक्यातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.