खानापूर / वार्ताहर
खानापूर येथील शांतीनिकेतन शाळेच्या क्रीडापटूंची हरियाणा येथे होणाऱ्या राष्ट्रीय पातळीवरील विद्याभारती क्रीडा महोत्सवासाठी अभिनंदनीय निवड झाली आहे.
बळ्ळारी येथे नुकत्याच पार पडलेल्या विद्याभारती राज्यस्तरीय क्रीडा महोत्सवामध्ये खानापूरच्या शांतिनिकेतन शाळेच्या क्रीडापटूंनी 4 सुवर्ण, 1 रौप्य आणि 2 कांस्य पदक हस्तगत करून चमकदार कामगिरी नोंदविली आहे. सदर क्रीडा महोत्सवात राज्यातील 10 जिल्ह्यांमधील 25 शाळांचा सहभाग होता.
या क्रीडा महोत्सवात शांतिनिकेतन शाळेच्या तेजस्विनी कोळी हिने हातोडा फेक स्पर्धेत सुवर्ण पदक आणि थाळीफेक स्पर्धेत रौप्य पदक पटकाविले. त्याचप्रमाणे अनुष्का कवंडलकर हिने चालण्याच्या स्पर्धेत प्रथम क्रमांकासह सुवर्णपदक मिळविले. ओमकार नाडूरकर याला 400 मी. धावणे शर्यतीत सुवर्ण तर 100 मी. धावण्यात कास्यपदक मिळाले. उत्कर्षा पाटीलला 3000 मी. धावण्याच्या शर्यतीत तृतीय क्रमांकासह कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. शांतिनिकेतन शाळेच्या श्रीहर्ष गौरव, प्रत्युष नाईक, शुभम पाटील व स्वयंम नाईक यांनी रिले चमकदार कामगिरी नोंदविली. या सर्व क्रीडापटूंना शाळेचे क्रीडा शिक्षक ओमकार सावंत व सागर कोळेकर यांचे मार्गदर्शन लाभत आहे.
0 Comments