बेंगळूर / प्रतिनिधी

कर्नाटकचे अन्न, नागरी पुरवठा,  ग्राहक व्यवहार आणि वनमंत्री उमेश कत्ती यांचे मंगळवारी रात्री हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने निधन झाले. निधन समयी ते 61 वर्षांचे होते. ते तब्बल सहा वेळा कर्नाटक विधानसभेचे सदस्य होते.तसेच हुक्केरी (बेळगाव) विधानसभा मतदार संघाचे प्रतिनिधित्व करत होते.

मंगळवारी संध्याकाळी बेंगळूर डॉलर्स कॉलनी  येथील  निवासस्थानी हृदयविकाराचा झटका आल्यानंतर त्यांना एम. एस. रामय्या इस्पितळात  दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

मंत्री उमेश कत्ती यांच्या निधनानंतर मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी राज्याने एक मुत्सद्दी  राजकारणी गमावल्याचे ट्विट करून शोक व्यक्त केला.

मुख्यमंत्र्यांसह अन्य मंत्र्यांनी बेंगळूर येथे घेतले अंतिम दर्शन

राज्याच्या आणि बेळगाव जिल्ह्याच्या राजकारणात गेली अनेक वर्षे सक्रिय राहिलेल्या  मंत्री उमेश कत्ती यांचे मंगळवारी रात्री बेंगळूर येथे निधन झाले. यानंतर मुख्यमंत्री बसवराज बोम्माई यांच्यासह बेळगाव जिल्हा पालकमंत्री गोविंद कारजोळ, माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांनी त्यांचे अंतिम दर्शन घेतले.

आज शाळा महाविद्यालयांना सुट्टी

मंत्री उमेश कत्ती यांच्या निधनाने बेळगाव जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालये, शासकीय कार्यालयांना आज बुधवारी सुट्टी देण्यात आली आहे. त्यांचे पार्थिव बेंगळूर येथून विशेष विमानाने सकाळी 8 वाजता  बेळगाव विमानतळावर येणार असून नंतर हुक्केरी येथील हिरा शुगर येथे अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. यानंतर सायंकाळी 5 वाजता बेल्लद बागेवाडी येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत.