- परंपरेनुसार हिंदू मुलीवर केले अंत्यसंस्कार
- सर्व स्तरातून होतेय कौतुक
बेळगाव / प्रतिनिधी
फुले काढताना तोल जाऊन घराच्या गॅलरीतून पडल्याने एका मुलीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना वीरभद्रनगर, बेळगाव येथे घडली. या हिंदू मुलीच्या अंत्यसंस्कारासाठी पुढाकार घेऊन मुस्लीम नेत्यांनी माणुसकीचे दर्शन घडविले आहे.
विद्याश्री हेगडे (रा. वीरभद्रनगर) असे त्या मृत मुलीचे नाव आहे. मूळच्या उडपी जिल्ह्यातील असलेल्या मुलीचे वडील कुटुंबासह गेल्या कित्येक वर्षांपासून बेळगावात वास्तव्यास आहेत.
गुरुवार दि. 15 सप्टेंबर रोजी सदर मुलगी इमारतीसमोरील फूल काढण्यासाठी गेली असता तोल जाऊन पहिल्या मजल्यावरून जमिनीवर पडली. यावेळी जखमी मुलीला स्थानिक मुस्लिम नेत्यांनी खासगी रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयातील उपचारांचा खर्चही त्यांनीच दिला. परंतु उपचारांचा उपयोग न होता त्या मुलीचे निधन झाले.
त्यानंतर मुस्लिम नेत्यांनी स्वत: पुढाकार घेऊन अंत्यसंस्काराची तयारी केली. सदाशिव नगर येथील लिंगायत स्मशानभूमीत लिंगायत परंपरेनुसार त्या मुलीवर अंत्यसंस्कार करण्यात आले. मुस्लिम नेत्यांच्या माणुसकीचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.
अंत्यसंस्काराला नगरसेवक बाबाजान मतवाले, रियाज किल्लेदार, इम्रान पारखान, शहीद पठाण, सलमान मंगलकट्टी, राजू शेख तसेच तट्टे इडली हॉटेलचे मालक शांतकुमार आदी उपस्थित होते.
0 Comments