पेडणे दि. २४ सप्टेंबर : 

विठ्ठलदासवाडा - मोरजी या किनारी भागात तीन कुटीरे व्यावसायिकांनी शेकडो लाकडी पलंग किनाऱ्यावर थाटले होते. पर्यटन खात्याचे उपसंचालक गजानन महाले यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी या व्यावसायिकांवर कारवाई करत हे सर्व सामान जप्त करण्यात आले. अचानक कारवाई झाल्यामुळे पर्यटकही भयभीत झाले होते.

कारवाई करत असताना या भागात कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून मोठ्या प्रमाणात पोलिसांचा फौजफाटा तैनात होता.


मोरजी किनारी भागात मोठ्या प्रमाणात लाकडी पलंग घातल्याची तक्रार स्थानिकांनी केली होती. त्यानुसार पर्यटन खात्याच्या अधिकाऱ्यांनी गुरुवारी येथील किनारी भागाची पाहणी केली. लाकडी पलंग घातलेल्या व्यावसायिकांना त्यांनी इशारा दिला होता. हे पलंग स्वतःहून हटवा अन्यथा कडक कारवाई केली जाईल, असा इशारा देऊनसुद्धा काही व्यावसायिकांनी याकडे दुर्लक्ष केले.

२३ रोजी पर्यटन खात्याचे उपसंचालक गजानन महाले यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. कारवाईत शेकडो लाकडी पलंग, टेबल, खुर्च्या, मोठ्या छत्र्या हस्तगत करण्यात आल्या.

ही कारवाई कायमस्वरूपी चालू राहणार आहे. लाकडी पलंग घालण्यासाठी ज्यांनी परवाने घेतलेले नाहीत, त्यांनी परवाने घ्यावेत आणि कायदेशीर व्यवसाय करावा. बेकायदा व्यवसाय करणाऱ्यांवर यानंतरही कडक कारवाई केली जाईल, असे पर्यटन खात्याचे उपसंचालक गजानन महाले यांनी सांगितले.