गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर पोलीस दल सज्ज
कायदा - सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी खबरदारी
बेळगाव / प्रतिनिधी
बेळगावमध्ये श्री गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी जिल्हा पोलीस आणि आरएएफ तर्फे पथसंचलन करण्यात आले.
शहरातील संवेदनशील आणि अतिसंवेदनशील भागात आज जिल्हा पोलीस आणि आरएएफ चे पथसंचलन पार पडले. या पथसंचलनाच्या माध्यमातून कायदा आणि सुव्यवस्थेला धक्का पोहोचविण्याचा विचार करणाऱ्या समाजविघातक प्रवृत्तींना सतर्कतेचा इशारा देण्यात आला.
शुक्रवार दिनांक ९ सप्टेंबर रोजी श्री गणेश विसर्जन होणार आहे. या पार्श्वभूमीवर आज शहरात हे पथसंचलन आयोजित करण्यात आले होते. या पथसंचलनात आरएएफ कर्मचाऱ्यांसह जिल्हा पोलीस कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. डीसीपी रवींद्र गडादी यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश असलेल्या या पथकाने संवेदनशील परिसरात गस्त घालत शांतीचा संदेश दिला.
गेल्या दोन वर्षात कोविडमुळे गणेशोत्सव जल्लोषात साजरा करण्यात आलेला नाही. मात्र यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे सर्वत्र मोठ्या थाटात गणेशोत्सव साजरा केला जात आहे. यामुळे गणेश विसर्जन काळात शहरात मोठ्या प्रमाणात नागरिक येण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून आज शहरात पथसंचलन करण्यात आले. शहरातील खडक गल्ली, काकती वेस, खडेबाजार आदी भागात फिरून शांतता बिघडविण्याचा प्रयत्न करणाऱ्या समाजकंटकांना यावेळी इशारा देण्यात आला. यावेळी एसीपी चंद्रप्पा, सीपीआय दिलीप निंबाळकर आदी अधिकारी रूट मार्चमध्ये सहभागी झाले होते.
0 Comments