- चौघेजण जखमी : अपघातानंतर कार चालक फरार
कारची केएसआरटीसी परिवहनच्या बसला धडक बसून झालेल्या अपघातात एकाच कुटुंबातील तीन ठार तर अन्य चौघे जण जखमी झाले. ही घटना विजयपूर जिल्ह्याच्या कोल्लार गावानजीक राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 218 वर कुपकड्डी क्रॉस जवळ बुधवारी सायंकाळच्या सुमारास घडली. या अपघातात कार मधून प्रवास करणाऱ्यांपैकी एकाच कुटुंबातील तीन ठार तर अन्य दोघे जण जखमी झाले आहेत. अपघातानंतर कार चालक फरार झाला आहे. मृतांमध्ये एक पुरुष एक महिला आणि एका नवजात बालिकेचा समावेश आहे. तर बसच्या दर्शनी भागाचे नुकसान झाले आहे. सुनंदा मल्लिकार्जुन कलशट्टी (वय 25), सुमन कलशट्टी (वय 3 महिने, नवजात बालिका) व शरणबसप्पा बसवराज कलशट्टी (सर्वजण रा. गुलबर्गा) अशी अपघातातील मृतांची नावे आहेत. तर उमेश कलशट्टी, सुरेखा कलशट्टी, सोनी कलशेट्टी (वय 8), यांच्यासह फरार कार चालकही जखमी झाला आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, केएसआरटीसी परिवहनची बस बागलकोटहून विजयपूर कडे येत होती. याच दरम्यान भरधाव वेगात KA-32, Z-1706 क्रमांकाची कार हुबळीच्या दिशेने जात होती. यावेळी पुढे असलेल्या वाहनाला ओव्हरटेक करण्याच्या नादात कार चालकाचा ताबा सुटल्याने कारची समोरून येणाऱ्या परिवहनच्या बसला जोरदार धडक बसून हा अपघात झाला. याचवेळी हुबळीच्या दिशेने जाणाऱ्या आणखी एका कारची अपघातग्रस्त कारला मागून जोराची धडक बसली. मात्र सुदैवाने त्या कार मधील कोणालाही गंभीर इजा न होता किरकोळ जखमी झाले.
अपघाताची माहिती मिळताच कोल्लार पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा करून मृतदेह ताब्यात घेतले. या घटनेची कोल्लार पोलिस स्थानकात नोंद करण्यात आली असून अधिक तपास करत आहेत.
0 Comments