•  बेळगाव शहरासह तालुक्यात गौरी आवाहन उत्साहात 


बेळगाव / प्रतिनिधी

रुणझुणत्या 'पाखरा' जारे माझ्या 'माहेरा'

आली गौराई अंगणी तिला लिंबलोण करा!

या गीताच्या ओळीप्रमाणेच बेळगाव शहरासह - तालुक्यात आज उत्साहात गौरी आवाहन करण्यात आले. गौरी ही तीन दिवसाची आपल्या घरी पाहुणी असते, ती माहेरवाशीण म्हणून आपल्या घरी येत असते. म्हणूनच आनंदाने आणि उत्साहाने गौरीचे आगमन करण्याची प्रथा आहे.




आज गौरी आवाहन असल्याने  महिलांची सकाळपासूनच लगबग सुरू होती. गौरीच्या स्वागतासाठी महिलांनी  सकाळीच दरवाजात सुरेख रांगोळी रेखाटली होती. गौरीसाठी लागणाऱ्या तांब्याच्या कलशांना चुन्याने सुबक नक्षीकाम केले होते. त्यामध्ये गंगा म्हणून  पाणी भरुन त्याला दागिन्यांनी सजवून घरोघरी गौरी आवाहन करण्यात आले. यावेळी परंपरेप्रमाणे चुरमुरे, काकडी, खोबऱ्याचा प्रसाद वाटण्यात आला.








विशेष म्हणजे आज गौरी आवाहनाला चिमुकल्या मुलींनाही गौरी प्रमाणेसाजशृंगार करून वेशभूषा करण्यात आली होती.

पुर्वीच्या काळी गावातील सर्व माहेरवाशिणी साजशृंगार करून एकत्रितपणे नदीवर जात कलशात नदीचे पाणी गंगा म्हणून भरून आणत.त्यातच नदीतले पाच खडे, नदीकाठावरील पाने-फुले वेलींनी कलश सजवला जायचा. मात्र कालानुरूप या पद्धतीत थोडा बदल झाला आहे. आता नदीच्या पाण्याची विहिरीचे पाणी गंगा म्हणून वापरले जाते. तसेच विविध प्रांतातही गौरी आवाहन वेगवेगळ्या पद्धतीने करण्यात येते.यंदा 4 सप्टेंबर रोजी गौरीपूजन तर 5 सप्टेंबर रोजी गौरी विसर्जन होणार आहे.