आ. अभय पाटील यांचे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना आवाहन

गणेश विसर्जन सोहळ्यात डॉल्बी वापरण्यास परवानगी


बेळगाव / प्रतिनिधी

सर्वोच्च न्यायालयाच्या नियमांचे पालन करत शहरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना विसर्जन सोहळ्यादरम्यान डॉल्बी वापरण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे सर्व गणेश मंडळांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार डॉल्बीचा वापर करावा असे आवाहन आमदार अभय पाटील यांनी केले आहे.

बेळगाव शहरात येत्या ९ सप्टेंबर रोजी होणार्‍या गणेश विसर्जन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पूर्वतयारीबाबत लोकमान्य गणेशोत्सव महामंडळाच्या नेतृत्वाखाली आमदार अभय पाटील, अनिल बेनके, विधान परिषदेचे माजी सदस्य महांतेश कवठगीमठ यांच्यासह शहरातील अनेक  गणेशोत्सव मंडळाच्या अध्यक्ष व सदस्यांनी रविवारी शहर पोलीस आयुक्त कार्यालयात येऊन वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा केली.

चर्चेनंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना आमदार अभय पाटील म्हणाले की, "बेळगावातील पारंपरिक गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर पूर्वतयारीबाबत चर्चा करण्यासाठी आज आम्ही पोलीस आयुक्तांच्या  कार्यालयात आलो आहोत.  गणेश विसर्जन सोहळ्या दरम्यान डॉल्बीच्या वापराबाबत आम्ही मंत्री आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांशी यापूर्वीच चर्चा केली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सर्व गणेश मंडळांना नियमांचे पालन करून डॉल्बीचा वापर करण्याचे आवाहन आम्ही यापूर्वीच केले आहे. गणेश विसर्जन सोहळ्यात  डॉल्बी लावण्याची सर्वांची इच्छा पूर्ण झाली आहे. त्यामुळे लोकमान्य गणेशोत्सव  महामंडळाचे कार्याध्यक्ष  सर्व गणेश मंडळांना याबाबत माहिती देणार आहेत. सर्वांनी नियमांचे पालन करावे असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी पत्रकारांशी बोलताना आमदार अनिल बेनके म्हणाले की, या संदर्भात चर्चेचा मुद्दा डॉल्बीच्या वापरास परवानगी देण्याचा आहे.  यासंदर्भात आम्ही गणेश मंडळांचे अध्यक्ष, सदस्य आणि वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची यापूर्वीच बैठक घेतली आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर गणेश विसर्जनाच्या काळात शहरात डॉल्बी वापरण्यास परवानगी देण्यात आली आहे.  त्यामुळे सर्व गणेश मंडळांनी न्यायालयाच्या आदेशाचे पालन करून डॉल्बीचा वापर करावा, असे ते म्हणाले.

यावेळी शहर पोलीस आयुक्त डॉ. एम. बी. बोरलिंगय्या , आमदार अनिल बेनके, अभय पाटील, लोकमान्य गणेशोत्सव महामंडळाचे कार्याध्यक्ष  विजय जाधव यांच्यासह महामंडळाचे सदस्य उपस्थित होते.