बेळगाव / प्रतिनिधी

गेल्या 28 दिवसांपासून बेळगावच्या रेस कोर्स परिसरातील जंगलात वावरणाऱ्या बिबट्याला पकडण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतीने पकडण्याचा प्रयत्न करूनही पोलीस व वनविभाग बिबट्याला जेरबंद करण्यात अद्यापही अपयशी ठरला आहे. चालाख बिबट्या सर्वांना सातत्याने  हुलकावणी देत आहे. दरम्यान आज पहाटे मंडोळी (ता. बेळगाव) गावानजीकच्या शेतजमिनीतही बिबट्याचे दर्शन घडल्याने ग्रामस्थांमध्ये घबराट निर्माण झाली आहे.

मंडोळी गावातील एका शेतकऱ्याला  आज सकाळी मोरारजी देसाई वसती शाळेनजीक शेतजमिनीत बिबट्या निदर्शनास आला. नेहमीप्रमाणे सकाळच्या सुमारास गवत आणण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याला धरणाजवळील शेतवाडीत बिबट्या दिसला. बिबट्या दिसताच त्यांने लागलीच गावाकडे धाव घेतली. तसेच गावातील पंच मंडळी आणि जबाबदार व्यक्तींना या प्रकाराची माहिती दिली. गावानजीक बिबट्या असल्याची माहिती तात्काळ वन विभागाला देण्यात आली.

माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी तातडीने मंडळी गावाकडे धाव घेऊन त्या शेत जमिनीत बिबट्याचा शोध सुरू केला. वनविभागाचे अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल होताच घटनास्थळी नागरिकांची गर्दी झाली होती. बिबट्या दिसल्याच्या  पार्श्वभूमीवर मंडोळी ग्रामस्थांना  सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या असून बिबट्या पुन्हा आढळल्यास ग्रामपंचायत आणि वनविभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.