अवघ्या चार तासातच आरोपी गजाआड
पैशाच्या देवाण-घेवाणीवरून खून झाल्याचे उघड
बेळगाव / प्रतिनिधी
हलगा तारिहाळ मार्गावर धारदार शस्त्राने मानेवर वार करून दुचाकीस्वाराचा खून केलेल्या आरोपीला अवघ्या चार तासातच पोलिसांनी अटक केली. शुक्रवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास गदगय्या पुजारी (वय 40 मूळचा कोंडसकोप्प, सध्या रा. शिंदोळी ) याचा निर्घृण खून करण्यात आला होता. याप्रकरणी विठ्ठल सांबरेकर (वय 38) याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
कोंडसकोप्प येथील विठ्ठल सांबरेकर मयत गदगय्या त्यांची घनिष्ठ मैत्री होती. गदगय्या ज्योतिषी होता. आरोपी विठ्ठल सांबरेकर याने 2 वर्षांपूर्वी गदगय्याला 2 लाख रुपये दिले होते. ते परत देण्याची मागणी विठ्ठल हा गदगय्याकडे गेल्या सहा महिन्यांपासून करत होता. पण गदगय्याने विठ्ठलच्या मागणी गांभीर्याने न घेता दुर्लक्ष केले. उलट प्रत्येक वेळी त्याने विठ्ठलला उडवाउडवीची उत्तरे दिली. याच रागातून विठ्ठलने गदगय्याचा काटा काढण्याचे ठरविले.
यानुसार शुक्रवारी सायंकाळी त्याने संधी साधून धारदार शस्त्राने वार करून गदगय्या याचा खून केला. शुक्रवारी विठ्ठल सांबरेकर शिंदोळीला आला होता. त्यानंतर विठ्ठल आणि गदगय्या दोघेही सांबऱ्याला गेले. गदगय्या धारवाडहून रेल्वेने चेन्नईला जाणार होता. याच दरम्यान गदगय्या दुचाकीने शिंदोळी त्यानंतर कोंडस्कोप कडे निघाले होते. यावेळी विठ्ठल हा दुचाकीवर मागे बसला होता तर गदगय्या दुचाकी चालवत होता. हलगा येथे दुचाकी थांबल्यावर मागे बसलेल्या विठ्ठलने गदगय्या त्याच्या मानेवर सपासप वार करून निर्घृण खून केला आणि तिथून फरार झाला.
घटनेची माहिती मिळताच पोलीस आयुक्त एम. बी. बोरलिंगय्या, पोलीस उपायुक्त रवींद्र गडादी आदींनी घटनास्थळी केली. तर पोलीस निरीक्षक विजय शिंनूर यांनी पंचनामा केला होता. यानंतर विजय शिंनूर यांनी गतीने तपास करून आरोपी विठ्ठल याला अवघ्या चार तासातच अटक केली.
0 Comments