नगरविकास खात्याकडून आरक्षण जाहीर
बेळगाव / प्रतिनिधी
नगर विकास खात्याने महापौर- उपमहापौर निवडीचे आरक्षण जाहीर केल्यामुळे बेळगाव महानगरपालिकेची प्रतीक्षा संपली आहे. महानगरपालिकेची निवडणूक होऊन वर्षाचा कालावधी होत आला तरी आरक्षणाच्या मुद्द्यावर महापौर आणि उपमहापौर निवडीचे भिजत घोंगडे होते. नगरसेवकांचा शपथविधी झालेला नाही.परिणामी आपल्या वॉर्डमधील समस्या सोडविण्याबरोबरच विविध विकास कामे राबविताना नगरसेवकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत होता. यासाठी महापौर व उपमहापौर निवडणूक घेण्यात यावी अशी मागणी नवनिर्वाचित नगरसेवक व जनतेतून होत होती.
अखेर आज आरक्षण जाहीर झाल्यामुळे महापौर-उपमहापौर निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्याच्या दहा महानगरपालिकांच्या महापौर उपमहापौर निवडीचे आरक्षण जाहीर झाले असून नगरविकास खात्याचे टी. मंजुनाथ यांनी बुधवारी ही घोषणा केली.
जाहीर झालेल्या आरक्षणानुसार बेळगाव महानगरपालिकेच्यामहापौरपदासाठी सामान्य वर्ग तर उपमहापौरपदासाठी अनुसूचित जाती महिला असे आरक्षण जाहीर झाले आहे.
बेळगावसह राज्यातील बळ्ळारी, विजयपूर, कलबुर्गी, तुमकुर, हुबळी धारवाड, म्हैसूर, मंगळूर आणि दावणगिरी या महानगरपालिकांचेही आरक्षण जाहीर करण्यात आले आहे.
आरक्षण जाहीर झाल्यामुळे आता बेळगाव महानगरपालिकेच्या महापौर-उपमहापौर पदी कोण विराजमान होणार याबाबत सर्वत्र चर्चा सुरू आहे.
0 Comments