- विठ्ठल-रुक्मिणी भजनी मंडळाची परंपरा
- सन 1985 पासून अविरत पायी दिंडी
सालाबाद प्रमाणे यंदाही पवित्र श्रावण महिन्यानिमित्त विठ्ठल-रुक्मिणी भजनी मंडळ सुळगा (हिं.) यांच्या वतीने आज सोमवार दि. 8 ऑगस्ट रोजी पवित्र तीर्थक्षेत्र वैजनाथ येथे पायी दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. प्रारंभी सकाळी 8 वाजता गावातील विठ्ठल मंदिरात देव विठ्ठल-रुक्मिणीचे पूजन करण्यात आले.
यावेळी ह.भ.प. मल्लाप्पा भैरू पाटील यांच्या हस्ते वीणा पूजन करण्यात आले. तसेच आजच्या पायी दिंडीसाठी प्रसादाचे सर्व साहित्य उपलब्ध करून दिल्याबद्दल ह.भ.प. अशोक परशराम पाटील यांच्या हस्ते शाल,श्रीफळ व पुष्पहार देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे ज्येष्ठ वारकरी ह.भ.प. रवळू यल्लाप्पा चौगुले यांचाही ह.भ.प. अशोक पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यानंतर गावातील सर्व वारकऱ्यांच्या उपस्थित दिंडी तीर्थक्षेत्र वैजनाथकडे मार्गस्थ झाली. वरुण राजाची दमदार हजेरी असतानाही नेहमीच्याच उत्साहात सर्व वारकरी बंधू-भगिनी टाळ-मृदंगाच्या गजरात व विठू नामाच्या जयघोषात दिंडीत सहभागी झाले होते.
दुपारी तीर्थक्षेत्र वैजनाथ येथे दर्शन घेऊन भजन करण्यात आले. एकादशी असल्याने महाप्रसादाऐवजी खिचडी व चहापानानंतर या दिंडीची सांगता झाली.
0 Comments