बिबट्याला जेरबंद करण्यासाठी वनविभागाचे प्रयत्न

बेळगाव / प्रतिनिधी

गेल्या दोन दिवसांपूर्वी बेळगाव शहरातील जाधवनगर परिसरात बिबट्या आढळून  आला होता. या बिबट्याने हल्ला करून एका बांधकाम कामगाराला जखमी केले होते. वनविभागाचे कर्मचारी आणि पोलिसांकडून त्या बिबट्याला जेरबंद करण्यासाठी शोध मोहीम सुरू होती. खबरदारी म्हणून आजूबाजूच्या  परिसरातील नागरिकांना रात्रीच्या वेळी घराबाहेर न पडण्याची सूचना पोलिसांनी केली होती. बिबट्याला पकडण्यासाठी गदग जिल्ह्यातून तज्ञांच्या पथकाला पाचारण करण्यात आले होते.

ही  घटना ताजी असतानाच आज पुन्हा बेळगावच्या गोल्फ क्लब जवळ काही स्थानिकांना बिबट्याचे दर्शन घडल्याने नागरिकांमध्ये घबराट  निर्माण झाली आहे.

नागरिकांकडून मिळालेल्या माहितीनंतर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी दाखल होत पिंजरा लावून  बिबट्याला जेरबंद करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.