- आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांचे प्रतिपादन
- सुळगा (हिं.) येथे हळदीकुंकू समारंभ संपन्न
सुळगा (हिं.) / वार्ताहर
महिला असूनही ग्रामीण भागातील जनतेने विश्वास ठेवून निवडून दिले. त्यामुळेच राज्याच्या 224 पैकी 6 महिला आमदारांमध्ये मी स्वतःही आमदार असून याचा अभिमान आहे. निवडून येताच मतदार संघातील समस्या सोडवण्याची दिलेली ग्वाही पूर्ण करून विरोधकांना कामाच्या माध्यमातून उत्तर दिले. यापुढेही विकासाचा ध्यास बाळगून ग्रामीण भागाचे नंदनवन करणार असून येणाऱ्या निवडणुकीतही जनतेने पाठिंबा द्यावा असे प्रतिपादन बेळगाव ग्रामीण मतदार संघाच्या आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी केले.
सुळगा (हिं.) येथील प्राथमिक मराठी शाळेच्या क्रीडांगणावर झालेल्या महिलांच्या हळदीकुंकू समारंभात त्या बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर कार्यक्रमाच्या तसेच ग्रा. पं. अध्यक्षा निर्मला कलखांबकर, एपीएमसीचे माजी अध्यक्ष युवराज कदम, ग्रा. पं. सदस्य यल्लाप्पा कलखांबकर, भागाण्णा नरोटी, इतर ग्रा. पं. सदस्य आणि सदस्या, गावातील रोजगार हमी योजना गटांच्या प्रमुख महिला सदस्या यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
प्रारंभी सरस्वती, छ. शिवाजी महाराज, संगोळ्ळी रायाण्णा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. छ. शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन आ.लक्ष्मी हेब्बाळकर , संगोळ्ळी रायाण्णा यांच्या प्रतिमेचे पूजन एपीएमसीचे माजी अध्यक्ष युवराज कदम, सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन कार्यक्रमाच्या तथा ग्रा.पं.अध्यक्षा निर्मला कलखांबकर तर ग्रा. पं. सदस्य यल्लाप्पा कलखांबकर यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन केले. दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाला सुरुवात झाली.
यानंतर कार्यक्रमाच्या तथा ग्रा. पं. च्या अध्यक्षा निर्मला कलखांबकर यांच्याहस्ते आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांचे तर ग्रा. पं. सदस्य भागाण्णा नरोटी यांच्याहस्ते एपीएमसीचे माजी अध्यक्ष युवराज कदम यांचे शाल व पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. यावेळी सुळगा (हिं.) गावची कन्या व केंद्रीय विद्यालय दोनची विद्यार्थिनी कुमारी रुचिका अमोल पाटील हिने सीबीएससी बोर्डात 99.40 टक्के गुण मिळवून राज्यात प्रथम व देशात चौथा क्रमांक प्राप्त केल्याबद्दल आ. लक्ष्मी हेब्बाळकर यांच्याहस्ते पुष्पगुच्छ व शाल प्रदान करून तिचा सत्कार करण्यात आला.
यावेळी आ. लक्ष्मी हेब्बाळकर पुढे म्हणाल्या, बेळगाव ग्रामीण मतदारसंघात 103 मंदिरांचे काम सुरू आहे. याबरोबरच उचगाव सारख्या ठिकाणी बी. ए.,बी. कॉम डिग्री कॉलेज उभारण्याचे काम सुरू आहे. पुढील दोन वर्षात हे काम पूर्ण होणार असून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची सोय होणार आहे. तसेच ग्रामीण भागातील प्राथमिक शाळांच्या विकासासाठीही भरघोस निधी दिला आहे. कोरोना काळात ग्रामीण भागातील जनतेच्या आरोग्याच्या दृष्टीने शक्य होईल तेवढी मदत केली.अतिवृष्टीमुळे घरे कोसळलेल्यांना नुकसान भरपाई तसेच नवीन घरे मिळवून दिली. उद्योगखात्री योजनेतून गावातील महिलांना रोजगार उपलब्ध केला असून सुमारे 600 महिला उद्योग खात्री योजनेच्या माध्यमातून काम करत आहेत. मारिहाळमध्ये एक कोटी खर्चून मराठा भवन उभारण्यात आले आहे. भविष्यात लग्नसमारंभासाठी गावोगावी कार्यालय उभारण्याचा आपला मानस आहे. याशिवाय मतदार संघातील वारकऱ्यांसाठी बसूर्ते येथे एक कोटीचे भवन मंजूर करण्यात आले असल्याचेही आमदार हेबाळकर यांनी यावेळी सांगितले. नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस राजहंस गडावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात येणार असून या सोहळ्याला सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन त्यांनी केले. तसेच गणेशोत्सवाची लगबग असतानाही वेळात वेळ काढून कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या महिलांचे आभार मानताना ,सर्वांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या.
यावेळी एपीएमसीचे माजी अध्यक्ष युवराज कदम म्हणाले आज ग्रामीण भागातील महिला उंबरठ्या बाहेर पडल्या याचे सर्व श्रेय आ.लक्ष्मी हेब्बाळकर यांचेच आहे.आमदारकीच्या साडे चार वर्षात ग्रामीण मतदार संघासाठी त्यांनी साडे सोळाशे कोटी रुपयांचा भरघोस निधी मिळवून दिल्याचे स्पष्ट केले .या निधीतून शेती-शिवारे, नदी, प्रत्येक गावातील सिमेंट काँक्रिटचे रस्ते, पिण्याच्या पाण्याची सोय, घरोघरी पाणी पुरवठा, विजेची सोय, ग्रामीण मतदार संघातील 103 मंदिरांची कामे सुरु आहेत. तसेच ग्रामीण भागातील प्राथमिक शाळा सुधारणांसाठी साडेचार कोटी निधी देऊन त्यांनी सहकार्य केले. सुळगा (हिं.) येथील प्राथमिक मराठी शाळेच्या विकासासाठी साडे सतरा लाखांचा निधी दिला आहे. महिलांसाठी पेन्शन सुरू करण्यातही आमदारांनी पुढाकार घेतल्यामुळे जिल्ह्यात बेळगाव ग्रामीण मतदारसंघ पेन्शन घेणाऱ्या महिलांच्या बाबतीत आघाडीवर आहे. कोरोना काळातही आमदार हेब्बाळकर यांनी मतदार संघातील जनतेच्या आरोग्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे कार्य केले. आरोग्य विभागाशी वारंवार पाठपुरावा करून गावोगावी कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहीम राबवली म्हणूनच ग्रामीण भागातूनही कोविड हद्दपार झाल्याचे पाहायला मिळत असल्याचे सांगितले. आगामी विधानसभा निवडणुका येत्या पाच सहा महिन्यात होणार आहेत. तेव्हा कोणाच्याही आमिषाला भूलथापांना बळी पडू नका. गतवेळच्या निवडणुकीपेक्षा यावेळी आपल्या लाडक्या आमदार मोठ्या मताधिक्याने निवडून येतील आणि यांच्या रूपाने ग्रामीण भागातील पहिला मंत्री पाहायला मिळेल असा विश्वासही युवराज कदम यांनी व्यक्त केला.साडे चार वर्षात आमदार लक्ष्मी हेब्बाळकर यांनी साडे सोळाशे कोटी निधी आणला. मग आगामी निवडणुकीत निवडून दिल्यानंतर मंत्री झाल्यावर प्रत्येक वर्षी साडेसोळाशे कोटींचा निधी त्या मतदारसंघासाठी आणतील, आमदार हेब्बाळकर या केवळ आमदार नव्हे तर कर्नाटक राज्यातील सर्वश्रेष्ठ महिला नेतृत्व आहेत असे ते म्हणाले.
गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला हळदी कुंकू कार्यक्रम आयोजित करून सुद्धा वेळात वेळ काढून या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेल्या महिला व महिलांनी एकत्र येण्यासाठी हळदी कुंकू समारंभ आयोजन करण्याची संकल्पना राबवणाऱ्या आमदार हेब्बाळकर यांना ग्रा. पं. सदस्य यल्लाप्पा कलखांबकर व अजित कलखांबकर धन्यवाद दिले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन श्रीमती रेखा पाटील यांनी केले.तर रोजगार हमी योजनेतील गटप्रमुख कल्पना पाटील यांनी आभार मानले. या कार्यक्रमाला गावातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
0 Comments