अपघातात दुचाकीचे मोठे नुकसान : महात्मा फुले रोडवरील घटना
अपघाताचे दृश्य सीसीटीव्हीत कैद
बेळगाव / प्रतिनिधी
चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव वेगात असलेल्या कारची पार्कींग मध्ये उभ्या असलेल्या दुचाकीला धडक बसून झालेल्या अपघातात दुचाकीचे मोठे नुकसान झाले आहे. ही घटना आज सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास शहापूर महात्मा फुले रोडवरील साई प्लायवुडस शोरूम समोर घडली.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार कार क्रमांक KA-22, P- 0138 ही लाल रंगाची भरधाव वेगात शिवाजी गार्डनच्या दिशेने निघालेली स्विफ्ट कार महात्मा फुले रोड वरील साई प्लायवूडस शोरूम नजीक आली असता. चालकाचा ताबा सुटून शोरूमच्या पार्कींग मध्ये उभ्या असलेल्या KA-22,HE-9326 क्रमांकाच्या सुझुकी एक्सेस दुचाकीला धडकली. या अपघातात दुचाकीचे मोठे नुकसान झाले आहे. या अपघाताची सर्व दृश्ये साई प्लायवुडस शोरूमच्या सीसीटीव्हीत कैद झाली आहेत.
अपघातात नुकसान झालेली दुचाकी मल्लाप्पा यल्लाप्पा कदम (रा. सुळगा, हिं.) यांच्या मालकीची तर स्विफ्ट कार राजू लक्ष्मण चौगुले, (रा. अंजनेयनगर, बेळगाव) यांच्या मालकीची असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
या घटनेची नोंद शहापूर पोलीस स्थानकात करण्यात आली असून पोलिस अधिक तपास करत आहेत.
0 Comments