बेळगाव /प्रतिनिधी

बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील यांच्या पुढाकाराने उद्या रविवार दि. 21 ऑगस्ट रोजी पाटील फार्म पी.बी.रोड या ठिकाणी विशेष क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 9 नंतर या ठिकाणी क्रीडा प्रकारांना सुरुवात होणार आहे.

यात चिखलामध्ये रस्सीखेच याबरोबर दहीहंडी फोडणे असे खेळ होणार आहेत. गोकुळाष्टमीच्या निमित्ताने हा क्रीडा महोत्सव होणार आहे. युवा वर्गाला मातीतील खेळांचा आनंद देणाऱ्या या क्रीडा महोत्सवात सहभागी होण्याचे आवाहन आमदार अभय पाटील यांनी केले आहे. गेल्या सुमारे बारा वर्षांपासून हा महोत्सव आयोजित करण्यात येत आहे. मात्र गेल्या दोन वर्षात कोरोनामुळे या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले नव्हते. मात्र आता कोरोना आटोक्यात आल्यामुळे या महोत्सवाचे आयोजन करून गोकुळाष्टमी मोठ्या उत्साहात साजरी करणार असल्याची माहिती आमदार अभय पाटील यांनी दिली. लवकरच आंतरराष्ट्रीय स्तरावरील पतंग महोत्सवाचेही आयोजन करण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.