- शहरासह तालुकावासिय गणेशोत्सवासाठी सज्ज
- भक्तांचा उत्साह शिगेला
- नागरिकांची खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी
- गर्दीमुळे मुख्य मार्गांवर वाहतूक कोंडी
गणेशोत्सव अवघ्या काही तासांवर येऊन ठेपला असून लाडक्या बाप्पाच्या आगमनासाठी शहरासह तालुकावासीय सज्ज आहेत. सर्वत्र आनंद उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
पावसाळी वातावरण असतानाही बाप्पाच्या स्वागतासाठी शोभिवंत वस्तू, मखर, पडदे, लाईटच्या माळा, फळे-फुले पूजेचे साहित्य, मोदक लाडू पेढे खरेदीसाठी आज मंगळवार सकाळपासूनच बाजारात नागरिकांची गर्दी होऊ लागली आहे. कोरोनाच्या संकटानंतर तब्बल दोन वर्षांनंतर गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याचा आनंद द्विगुणित करण्यासाठी भक्तांबरोबर बाजारपेठही विविध साहित्याने सजली आहे. विशेषतः बाजारात पूजेचे साहित्य, सजावटीचे साहित्य, विद्युत रोषणाईचे साहित्य त्याचबरोबर कपडे आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदीसाठी गर्दी दिसून येत आहे. नागरिकांच्या गर्दीमुळे मुख्य मार्गांवर होणारी वाहतूक कोंडी टाळण्यासाठी शहरातील ठराविक रस्ते पोलिसांनी बॅरिकेड्स लावून बंद केले आहेत.
गणेशमूर्ती विक्रेत्यांकडे कुंदन वर्क करणाऱ्यांची लगबग
गणेशोत्सव उद्यावर येऊन ठेपला असतानाच आगाऊ रक्कम देऊन बुक केलेली बाप्पांची मूर्ती आकर्षक दिसावी याकरिता युवा वर्गाची मूर्तीला कुंदन वर करण्यासाठी विक्रेत्यांकडे लगबग दिसून येत आहे.
फटाक्यांचीही मोठी विक्री
गणेशोत्सवात फटाक्यांना मोठी मागणी असते. बाप्पांचे आगमन असो वा विसर्जन सोहळा फटाक्यांची आतिषबाजी केली जाते. याच पार्श्वभूमीवर लहान मुले,युवावर्ग, मोठ्या प्रमाणात फटाके खरेदी करत आहेत. यातून मोठी उलाढाल झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
दरम्यान गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी बाजारपेठेत होणारी गर्दी टाळण्याकरिता खरेदीस येणाऱ्या नागरिकांनी आपली वाहने बाजारपेठे बाहेरच पार्क करावीत, असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.
0 Comments