• विविध विद्यार्थी संघटनांची मागणी
  • पंतप्रधान नरेंद्र मोदींना रक्ताने पत्र लिहून केले आंदोलन

कारवार / प्रतिनिधी

राज्याच्या उत्तर भागातील जिल्ह्यांसाठी स्वतंत्र सुपर स्पेशलिटी हॉस्पिटल सुरू करावे अशी मागणी राज्याच्या विविध विद्यार्थी संघटनांच्या वतीने करण्यात आली आहे.

सोमवारी कारवार शहरातील महात्मा गांधी रोडवर विविध विद्यार्थी संघटनांनी एकत्र येऊन आंदोलन केले. यावेळी रक्ताने पत्र लिहून उत्तर कर्नाटकातील जिल्ह्यांसाठी हॉस्पिटल मंजूर करण्याची मागणी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे करण्यात आली. "आम्हाला सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलची गरज असल्याचे या पत्रात नमूद करण्यात आले आहे.

 जनतेला तातडीच्या उपचारांसाठी गोवा, हुबळी, उडपी आणि मंगळूर तेथे जावे लागते. अलीकडेच दि. 20 जुलै रोजी कारवार जिल्ह्याच्या होन्नावर येथील चौघांचा मृत्यू झाला होता. यानंतर स्वतंत्र हॉस्पिटलची मागणी जोर धरू लागली आहे. जोपर्यंत मागणी पूर्ण होत नाही. तोपर्यंत रक्ताने लिहिलेली पत्रे पंतप्रधानांना पाठवत राहणार असल्याचे आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांनी यावेळी सांगितले.

हा जिल्हा सत्ताधारी भाजपचा बालेकिल्ला मानला जातो. पण आश्वासने देऊनही पक्षाने स्वतंत्र रुग्णालय देण्याची मागणी अद्यापही पूर्ण केलेली नाही. स्वतंत्र रुग्णालय सुरू करण्यात अपयश आल्याने विरोधी पक्षांकडून सत्ताधाऱ्यांवर टीकाही होत आहे.

रूग्णालयाला लवकर मंजुरी न दिल्यास आगामी विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा इशाराही यावेळी देण्यात आला.भौगोलिक क्षेत्र मोठे असले तरी एकही मल्टी स्पेशालिटी किंवा सुपर स्पेशलिटी रुग्णालय नसणे हे जिल्ह्याचे दुर्दैव असल्याचेही स्थानिकांनी यावेळी स्पष्ट केले.