हुबळीजवळ विजेच्या टॉवरवर चढून आत्महत्या करण्याच्या बेतात असलेल्या व्यक्तीचे प्राण वाचवण्यात हेस्कॉम ग्रामीण उपविभागाचे कार्यकारी अभियंता किरणकुमार यांना यश आले आहे.
बिडनाळजवळील 11 केव्ही हाय टेंशन टॉवरवर चढून राघवेंद्र बळ्ळारी नावाचा माणूस आत्महत्येचा प्रयत्न करत होता. स्थानिकांच्या हे लक्षात आल्यावर त्यांनी राघवेंद्रला खाली उतरवण्याचा प्रयत्न केला. पण तो अयशस्वी ठरला. नंतर एका स्थानिकाने हेस्कॉमचे अधिकारी किरणकुमार यांना बोलावले. अधिकाऱ्यांनी तत्काळ कारवाई करत वीज जोडणी बंद केली.
सुदैवाने कनेक्शन खंडित झाल्याने राघवेंद्र यांचा वीज ताराला स्पर्श होऊनही त्याला कोणतीही हानी झाली नाही. अन्यथा क्षणात त्याचा कोळसा झाला असता. एका हेस्कॉम अधिकाऱ्याच्या तत्परतेमुळे त्याचे प्राण वाचले. कौटुंबिक कलहाच्या पार्श्वभूमीवर राघवेंद्रने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे बोलले जात आहे. हेस्कॉमच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून कर्मचाऱ्यांसह पाहणी केली. हेस्कॉम अधिकाऱ्याच्या या कार्यतत्परतेचे लोकांनी कौतुक केले आहे.
0 Comments