चिक्कोडी / वार्ताहर

महाराष्ट्रातील कोकण भागात मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे चिकोडी निपाणी तालुक्यातील 8 छोटे पूल पाण्याखाली गेल्याने वाहतुकीसाठी बंद झाले आहेत.

चिक्कोडी तालुक्यातील कृष्णा, वेदगंगा दूधगंगा नद्यांच्या पाणी पातळीत चार फुटांनी वाढ झाली आहे. राजापूर बॅरेज मधून 41167 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. सदलगा येथील दूधगंगा नदीत  16245 पाण्याचा विसर्ग सुरू आहे. त्यामुळे पाण्याच्या पातळीत सतत वाढ होत आहे.

याशिवाय चिक्कोडी निपाणी तालुक्यातील येडूर-कल्लोळ, कारदगा- भोज, भोजवडी - कुन्नूर, सिदनाळ- अकोला, जत्राट -भिवशी, ममदापूर - हुन्नरगी, कुन्नूर- बारवाड हे चिक्कोडी या निपाणी तालुक्याच्या सखल भागातील 8 पुलांवर पाणी आले आहे.

 येडूर, कल्लोळ चंदूर, इंगळी, मांजरी या नदीकाठच्या गावांना पुराचा धोका आहे. संभाव्य पुराची खबरदारी म्हणून तालुका प्रशासनाने नदीकाठच्या गावात मदत कार्याची सर्व तयारी केली आहे.