- उपांत्य फेरीत द.आफ्रिकेचा दारूण पराभव
लाहोर : चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या उपांत्य फेरीत न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेचा दारूण पराभव करत अंतिम फेरीत स्थान मिळवले आहे. आता चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना भारत वि. न्यूझीलंड या संघांमध्ये होणार आहे.
न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासातील विक्रमी धावसंख्या उभारत दक्षिण आफ्रिकेच्या संघाला मोठे आव्हान दिले होते. पण सातत्याने विकेट्स गमावल्याने आफ्रिकेचा संघ मागे राहिला. पण दक्षिण आफ्रिकेकडून डेव्हिड मिलरने अखेरच्या चेंडूवर शतक पूर्ण करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
भारत वि. न्यूझीलंड यांच्यातील सामना दुबईत ९ मार्चला खेळवला जाणार आहे. भारतीय संघाने ऑस्ट्रेलियाला उपांत्य फेरीत ४ विकेट्सने पराभूत करत आधीच अंतिम फेरीत स्थान मिळवले होते. तर आता न्यूझीलंडने आफ्रिकेला पराभूत करत फायनलचे तिकिट मिळवले.
न्यूझीलंड संघाने दिलेल्या ३६३ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना आफ्रिकेचा संघ ९ विकेट्स गमावत ३१२ धावाच करू शकला. उत्कृष्ट लयीत असलेला रायन रिकल्टन १७ धावा करत बाद झाला. तर कर्णधार टेम्बा बावुमा आणि रॅसी व्हॅन डेर ड्युसेन यांनी चांगली भागीदारी रचली पण संघाला विजयापर्यंत नेऊ शकले नाही. बावुमाने ७१ चेंडूत १ षटकार आणि ४ चौकारांसह ५६ धावा केल्या आहेत. तर ड्युसेनने ६६ चेंडूत २ षटकार आणि ४ चौकारांसह ६९ धावा केल्या. आफ्रिकेला सर्वात मोठा धक्का बसला तो म्हणजे क्लासेनच्या रूपात. क्लासेन ३ धावा करत बाद झाला. मारक्रम चांगल्या लयीत होता पण तो ३१ धावा करत बाद झाला.
मिलर वगळता आफ्रिकेच्या खलच्या फळीतील कोणालाच मोठी कामगिरी करता आली नाही. पण डेव्हिड मिलरने अखेरच्या चेडूवर आपले शतक पूर्ण केले. मिलरने अवघ्या ६७ चेंडूत १० चौकार आणि ४ षटकारांसह शतक पूर्ण केले. न्यूझीलंड संघाच्या गोलंदाजांनी उत्कृष्ट कामगिरी करत संघाला विकेट मिळवून दिल्या. मॅट हेन्री आणि ग्लेन फिलीप्सने प्रत्येकी २ विकेट घेतले. तर कर्णधार मिचेल सँटनरने सर्वाधिक ३ विकेट्स घेतले. मायकेल ब्रेसवेल आणि रचिन रवींद्र यांना १-१ विकेट घेता आली.
0 Comments