• बेकायदा कामे करण्यास नकार दिल्याचे कारण? 
  • गोजगा - मण्णूर रोडवर मोटारसायकल अडवून त्रिकुटाने केला हल्ला  

बेळगाव / प्रतिनिधी 

आंबेवाडी ग्रामपंचायतीच्या सेक्रेटरीवर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. सोमवारी दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास गोजगा - मण्णूर रोडवर मोटारसायकल वरून जाताना त्यांना अडवून रॉडने हल्ला करण्यात आला आहे. या घटनेने एकच खळबळ माजली आहे.

नागप्‍पा बसाप्पा कोडली (वय ३३) असे जखमी सेक्रेटरीचे नाव आहे. त्याच्यावर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत आहेत. त्याच्या डोक्याला दुखापत झाली आहे. घटनेची माहिती समजताच बेळगाव ग्रामीणचे प्रभारी एसीपी जे. रघू, मार्केटचे एसीपी संतोष सत्यनाईक, काकतीचे पोलीस निरीक्षक सुरेश शिंगे, एपीएमसीचे पोलीस निरीक्षक उस्मान आवटी व त्यांचे सहकारी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. 

ग्रामपंचायत सेक्रेटरीवर हल्ला झाल्याचे समजताच मनरेगा योजनेतून गोजगा परिसरात तलावाचे काम करणारे कामगारही सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल झाले. सेक्रेटरींवर हल्ला करणाऱ्यांवर त्वरित कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली. पोलीस अधिकाऱ्यांनी कारवाईचे आश्वासन देऊन कामगारांची समजूत काढली. 

गोजगा येथे मनरेगा योजनेतून तलावाचे काम सुरू आहे. पीडीओ व सेक्रेटरी नागाप्पा हे दोघे कामाची पाहणी करण्यासाठी गोजग्याला गेले होते. पीडीओ तिथेच थांबले तर नागाप्पा आपल्या मोटारसायकल वरून आंबेवाडीकडे येत होते. त्यावेळी तिघा जणांनी मोटारसायकल अडवून नागाप्पावर हल्ला केला.

बेकायदा कामे करण्यासाठी आपल्यावर काही सदस्य व त्यांच्या कुटुंबीयांकडून दबाव आणण्यात येत होता. आपण ही कामे केली नाहीत. म्हणून आपल्याला संपविण्यासाठी खुनी हल्ला केल्याचा आरोप जखमी नागाप्पाने केला आहे. काकती पोलिसांनी सिव्हिल हॉस्पिटलला भेट देऊन नागाप्पाची फिर्याद घेतली आहे. विक्रम, चेतन व इतरांनी आपल्यावर हल्ला केल्याचे सेक्रेटरीने सांगितले आहे.