बेळगाव / प्रतिनिधी 

जागतिक महिला दिनानिमित्त शनिवार दि. ८ मार्च रोजी (हरी क्रिष्णा ग्रुपच्या) महात्मा फुले रोड, बेळगाव येथील किसना डायमंड अँड गोल्ड ज्वेलरीतर्फे विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या तीन प्रेरणादायी महिलांना सन्मानित करण्यात आले. यावेळी किसना डायमंड अँड गोल्ड ज्वेलरीचे संस्थापक श्री. विनायक जाधव, श्री. प्रमोद बुगटे, श्री. सचिन कदम यांच्यासह कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या तथा सत्कारमूर्ती महिला उपस्थित होत्या.

प्रारंभी किसना डायमंड अँड गोल्ड ज्वेलरीच्यावतीने सत्कारमूर्ती महिलांचे स्वागत करण्यात आले. यानंतर संस्थापक श्री. विनायक जाधव, श्री. प्रमोद बुगटे, श्री. सचिन कदम यांच्याहस्ते महिला कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सत्कारमूर्तींना शाल, स्मृतीचिन्ह आणि गुलाबपुष्प देऊन सन्मानित करण्यात आले. 

यामध्ये सौ. माधुरी जाधव पाटील (समाजसेविका), सौ. शामल निरंजन कार्लेकर, (शिक्षिका, शिवाजी स्कूल येळ्ळूर ता.बेळगाव) व सौ. तनिषा कपिल काळभैरव (जागतिक टेबल टेनिसपटू) यांचा समावेश होता.

याप्रसंगी सत्कारमूर्ती महिलांनी सत्काराबद्दल कृतज्ञता केली. यावेळी बोलताना समाजसेविका सौ. माधुरी जाधव यांनी महिलांच्या सक्षमीकरणावर प्रकाश टाकला. एक महिला समाजसेविका म्हणून  स्वतःचे अनुभव सांगताना त्यांनी समाजसेवेचे महत्त्व पटवून दिले. तसेच उपस्थितांना सामाजिक उपक्रमांमध्ये सक्रियपणे सहभागी होण्याचे आवाहन केले.  

तर शिक्षिका शामल कार्लेकर यांनी आपला प्रेरणादायी जीवन प्रवास उलगडून सांगितला. त्याचप्रमाणे विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करून स्वतःच्या कर्तुत्वाचा ठसा उमटवलेल्या महिलांच्या प्रेरणादायी वाटचालीची माहिती देताना, महिला या समाजासाठी आदर्श असल्याचे त्यांनी सांगितले. 

कार्यक्रमप्रसंगी सत्कारमूर्तींसह महिला कर्मचाऱ्यांनी केक कापून महिला दिनाचा आनंद द्विगुणीत केला. 

या कार्यक्रमाला किसना डायमंड अँड गोल्ड ज्वेलरीचे पदाधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते. एकंदरीत सर्वांचे सहकार्य व अचूक नियोजनामुळे कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडला.