बेळगाव / प्रतिनिधी  

महापालिकेचे अपात्र नगरसेवक जयंत जाधव व मंगेश पवार यांना कर्नाटक उच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. महापौर - उपमहापौर निवडणूक १५ मार्च रोजी असल्याने प्रादेशिक आयुक्तांच्या निकालाला तात्पुरती स्थगिती दिली आहे. बुधवार दि.  १२ रोजी न्यायालयाने हा निकाल दिला असून यामुळे दोन्ही नगरसेवकांना आता महापौर - उपमहापौर निवडणूक लढविण्यासह मतदान प्रक्रियेतही सहभाग घेता येणार आहे.

खाऊकट्टा प्रकरणी प्रादेशिक आयुक्तांनी दोन्ही नगरसेवकांना अपात्र ठरवले होते. या निकालाला स्थगिती मिळावी यासाठी दोन्ही नगरसेवकांनी उच्च न्यायालयाच्या धारवाड खंडपीठात धाव घेतली होती. मात्र त्याआधीच याचिकाकर्ते सुजित मुळगुंद यांच्या वकिलांनी कॅव्हेट दाखल केल्याने नगरसेवकांची याचिका न्यायालयाने फेटाळली होती. त्यानंतर बेंगळूर येथील विकाससौथमधील नगर विकास खात्याच्या सचिव दीपा चोळणे यांच्याकडे पुन्हा याचिका दाखल करण्यात आली. त्याठिकाणी मंगळवारी सुनावणी झाली. सुनावणीला दोन्ही नगरसेवक हजर होते. नगरसेवकांच्या वतीने ॲड. रविराज पाटील यांनी तर तक्रारदार सुजित मुळगुंद यांच्यावतीने ॲड. नितीन बोलबंडी यांनी युक्तिवाद केला. त्यावेळी नगरविकास खात्याच्या सचिव दीपा चोळण यांनी बेळगावच्या प्रादेशिक आयुक्तांचा निकाल कायम ठेवत स्थगिती दिली नाही.

त्यामुळे गोची झालेल्या अपात्र नगरसेवकांनी तातडीने बुधवारी बेंगळूर येथील कर्नाटक उच्च न्यायालयात प्रादेशिक आयुक्तांच्या निकालाला स्थगिती देण्यात यावी, अशी याचिका दाखल केली. त्या ठिकाणी नगरसेवकांच्यावतीने ॲड. पूनम संदीप पाटील यांनी याचिका दाखल केली.

दरम्यान न्यायालयाने याचिका दाखल करून घेऊन त्यावर तातडीने सुनावणी घेतली. त्यावेळी ॲड. पूनम पाटील यांनी न्यायालयात प्रादेशिक आयुक्तांनी दिलेल्या निकालात अपात्र ठरविताना ठोस कारणे नाहीत, निकाल पूर्ण नाही, असा युक्तिवाद केला. त्याचबरोबर तक्रारदार मुळगुंद यांच्यावतीने ॲड. नितीन बोलबंडी यांनी देखील युक्तिवाद केला.   

दोघांचे म्हणणे ऐकून घेऊन न्यायमूर्ती सुनील दत्त यादव यांनी बेळगावच्या प्रादेशिक आयुक्तांच्या निकालाला तात्पुरती स्थगिती दिली. न्यायालयाच्या या निर्णयामुळे नगरसेवकांना दिलासा मिळाला असून १५ मार्च रोजी होणाऱ्या महापौर - उपमहापौर निवडणुकीत दोघांनाही सहभागी होता येणार आहे.