- डीजेच्या तालावर थिरकली तरुणाई
बेळगाव / प्रतिनिधी
बेळगाव शहर आणि परिसरात आज जल्लोषात रंगोत्सव साजरा करण्यात आला. शुक्रवारी सकाळपासूनच रंगीबेरंगी रंगांची उधळण करत गल्लोगल्ली रंगोत्सवाला उधाण आले होते.
शहरासह उपनगरात काल सायंकाळी पारंपरिक पद्धतीने होळीचा सण उत्साहात साजरा करण्यात आल्यानंतर आज शुक्रवारी सकाळी धुळवड देखील जल्लोषात आणि शांततेने साजरी करण्यात आली. रंगोत्सवामध्ये युवा पिढीचा सहभाग लक्षणीय दिसत होता. आज सकाळपासून गल्लोगल्ली युवक युवतींसह शहरवासीय रंगांची उधळण करत होते. 'बुरा ना मानो होली है' असे म्हणत एकमेकांना रंग लावून सर्वजण सणाचा आनंद द्विगुणित करत होते. पुरुषांप्रमाणेच महिलांनी रंगोत्सवात मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता. शहरातील गणपत गल्ली, मारुती गल्ली, खडेबाजार, कॉलेज रोडवर मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून आली. अनेक ठिकाणी रंगपंचमीच्या पार्श्वभूमीवर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. तरुणाईने विविध ठिकाणी आयोजिलेल्या डीजेवर देहभान विसरून थिरकत रंगोत्सवाचा मनमुराद आनंद लुटला.
शहरात आणि उपनगरी भागात पारंपरिक पद्धतीने रंगोत्सव साजरा करण्याचा प्रकार आजही जपलेला आहे. त्यामुळे शुक्रवारी नागरिकांच्या उत्साहाला प्रचंड उधाण आल्याचे पाहायला मिळाले. शहरातील खडक गल्ली, चव्हाट गल्ली, टेंगिनकेरा, गल्ली , कामत गल्ली विविध गल्ल्यासह चन्नम्मानगर, टिळकवाडी, अनगोळ वगैरे उपनगरांमध्ये रंगपंचमीच्या निमित्ताने रस्ते, उद्याने आदी ठिकाणी पाण्याची फवारणी करणारेच स्प्रिंकलर्स उभारण्यात आले होते. डीजे लावून संगीताच्या तालावर सामूहिक रंगपंचमी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमांमध्ये डीजेच्या तालावर रंगाची उधळण करत पाण्याच्या फवाऱ्याखाली बेभान नृत्य करताना तरुणाईचा उत्साह शिगेला पोहोचला होता. रंगपंचमीमुळे चव्हाट गल्ली, खडक गल्लीसह बऱ्याच ठिकाणचे रस्ते रंगानी न्हाऊन निघाले होते.
- जिल्हाधिकारी - जिल्हापोलिस प्रमुखांची सपत्नीक रंगपंचमी :
विशेष म्हणजे दिलखुलास वृत्तीचे जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन आणि जिल्हा पोलीस अधीक्षक डाॅ. भीमाशंकर गुळेद यांनी देखील संगीताच्या तालावर थिरकत सपत्नीक रंग खेळून रंगपंचमीचा मनमुराद आनंद लुटला. या दोन वरिष्ठ अधिकाऱ्यांप्रमाणेच इतर बऱ्याच प्रशासकीय व पोलीस अधिकाऱ्यांनी शहरवासीयांसमवेत आजच्या रंगोत्सवात सहभाग दर्शवला होता. काही ठिकाणी उत्साही तरुणांनी बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांना त्यांच्या परवानगीने जुजबी रंग लावून शुभेच्छा देत त्यांनाही सणाच्या आनंदात सहभागी करून घेतले होते.
- पांगुळ गल्लीतील अश्वत्थामा मंदिरासमोर परंपरेप्रमाणे लोटांगणे :
रंगपंचमीनिमित्त दरवर्षीप्रमाणे पांगुळ गल्ली येथील श्री अश्वत्थामा मंदिरासमोर मागणीसाठी व नवस फेडण्यासाठी आयोजित सामूहिक लोटांगणाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. भर उन्हाळा असून देखील या कार्यक्रमात बहुसंख्य स्त्री - पुरुष भाविक सहभागी झाले होते. उन्हाने तापलेल्या रस्त्यामुळे त्रास होऊ नये यासाठी स्थानिक कार्यकर्त्यांकडून भक्तीभावाने लोटांगण घालणाऱ्या भाविकांवर सतत पाण्याची फवारणी केली जात होती.
- व्हॅक्सिन डेपो मैदानावर सामूहिक होली मिलन कार्यक्रमाचे आयोजन :
प्रतिवर्षाप्रमाणे बेळगाव दक्षिणचे आमदार अभय पाटील यांनी व्हॅक्सिन डेपो मैदानावर सामूहिक होली मिलन कार्यक्रमाचे आयोजन केले होते. हा सामूहिक रंगोत्सवाचा कार्यक्रम तरुणाईच्या भरघोस प्रतिसादासह जल्लोषात पार पडला. शहरातील सध्याच्या वाढत्या उष्म्यामध्ये पाण्याची फवारणी करणाऱ्या स्प्रिंकलर्सनी संबंधित परिसरात गारवा पसरवला होता.
सकाळपासून सुरु झालेल्या या धुळवडीला दुपारपर्यंत उसंथ मिळाली नव्हती. मोटारसायकलीवरून दाखल होणारे तरुण आणि ठिकठिकाणी पाण्याचे फवारे लावून नृत्य करणारे तरुण दिसून आले. चेहऱ्यावर वेगवेगळे मुखवटे, चित्रविचित्र हावभाव, वेशभूषा तसेच रंगवलेले केस यामुळे या रंगोत्सवाला खऱ्या अर्थाने रंग चढला होता. युवतींचा पोशाख परिधान केलेले आणि विविध रंगांच्या केसाचे टोप व मुखवटे धारण केलेले युवक साऱ्यांचे लक्ष वेधून घेत होते.
एकंदरीत सणाचे पावित्र्य अबाधित राखून शहर - उपनगरात अपूर्व उत्साहात रंगपंचमीचा सण साजरा करण्यात आला.
0 Comments