• शेडेगाळी, बरगाव, भंडरगाळी, सन्नहोसुर व गर्लगुंजी गावातील बंद घरे चोरट्यांचे लक्ष्य 

खानापूर / प्रतिनिधी 

खानापूर तालुक्यातील बरगाव, भंडरगाळी, सन्नहोसुर, गर्लगुंजी तसेच शेडेगाळी या ठिकाणी बंद असलेल्या अनेक घरांचे कुलूप तोडून चोरट्याने ऐवज लांबवल्याची घटना‌ मंगळवार दि. ४ मार्च २०२५ रोजी रात्री घडली आहे. मात्र सदर घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. 

याबाबत घटनास्थळावरून प्राप्त माहितीनुसार, चोरट्यांनी मंगळवारी रात्री बरगांव येथील बंद असलेल्या चार घरांचे कुलूप तोडून ऐवज लांबविला असून भंडरगाळी येथे एका घराचे कुलूप तोडण्यात आले असल्याचे समजते. तर सन्नहोसूर येथे सामाजिक कार्यकर्ते भरमाणी पाटील व संदीप रामभाऊ पाटील यांच्या घराचे कुलूप तोडल्याचे उघडकीस आले आहे.यामध्ये संदीप रामभाऊ पाटील यांचे १५,०००/- रुपये चोरीला गेले असल्याचे ते सांगत आहेत. तर गर्लगुंजी या ठिकाणी सुद्धा एका को.ऑपरेटिव्ह सोसायटीचे कुलूप तोडल्याची माहिती आहे. याबाबत पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. या चोरीच्या घटनेमध्ये एकूण किती ऐवज चोरीला गेला आहे याची निश्चित माहिती समजू शकलेली नाही. याप्रकरणी पोलीस पुढील तपास करीत आहेत.

शेडेगाळी या ठिकाणी सुद्धा बंद असलेल्या ४ घरांचे कुलूप तोडल्याची घटना मंगळवारी रात्री घटली आहे. परंतु सदर घटना बुधवार दि. ५ मार्च रोजी रात्री १० वा.उघडकीस आली आहे.