• बसरकट्टीत फायनान्स कंपनीकडून कुटुंबाचा छळ
  • व्यवस्थापकाच्या चुकीमुळे कुटुंब बेघर 

बेळगाव / प्रतिनिधी 

सरकार व जिल्हा प्रशासनाने फायनान्स कंपन्यांना थकीत कर्जवसुलीसाठी कर्जदारांना त्रास देऊ नये अशा सूचना दिल्या आहेत. मात्र असे असतानाही बेळगाव तालुक्याच्या बसरकट्टी गावात फायनान्स कंपनीकडून अन्यायकारक पद्धतीने एका कुटुंबाचे घर जप्त करण्यात आल्याने सदर कुटुंब रस्त्यावर आले आहे. 

बसरकट्टी येथील कोळकर कुटुंबीयांनी घर बांधण्यासाठी गेल्या पाच वर्षांपूर्वी मणिपुरम फायनान्स कंपनीकडून कर्ज घेतले होते. मात्र दर महिन्याला कर्जाचा हप्ता भरूनही त्यांनी कर्ज न भरल्याचे दाखवून मणिपुरम फायनान्सच्या व्यवस्थापकाने सात महिन्यांपूर्वी बसरकट्टी गावातील या कुटुंबाचे घर जप्त करून कुटुंबाला घराबाहेर काढले. 

याबाबत प्रसारमाध्यमांना माहिती देताना यशवंत कोळकर म्हणाले, गेल्या सात महिन्यांपासून आम्ही न्यायासाठी आंदोलन करत आहोत, मात्र आजतागायत आम्हाला न्याय मिळाला नाही. उर्वरित रक्कम पाच लाख रुपये आहे. पैसे मिळणार असूनही पैसे दिले जात नाहीत. घरच्यांना त्रास होत असल्याने कुटुंबीयांना अश्रू अनावर झाल्याची परिस्थिती आहे.

कर्जाचा हप्ता व्यवस्थित भरला असतानाही त्यांनी आमचे घर जप्त केले आहे. मणिपुरमच्या आर्थिक छळामुळे अनेक कुटुंबे रस्त्यावर आली आहेत. आम्ही थकबाकी भरण्यास तयार आहोत. मात्र आमचे जप्त केलेले घर परत दिले पाहिजे, असे त्यांनी सांगितले. ग्रामीण भागात मायक्रो फायनान्सची समस्या वाढत असून, जिल्हाधिकाऱ्यांनी बैठक घेऊन त्यावर अंकुश ठेवण्याच्या सूचना देऊनही फायनान्स कंपन्यांनी अजून कर्जदारांना त्रास देणे थांबवलेले नाही. मायक्रो फायनान्स करणाऱ्यांवर कडक कारवाई व्हावी, असा आग्रह धरला जात आहे.

मणिपुरमच्या आर्थिक छळामुळे आमच्यावर अन्याय झाला आहे. आम्ही कर्जाचा हप्ता वेळेवर भरला असला तरी व्यवस्थापकाने फसवणूक केल्याने आमचे घर बळकावले आहे. मणिपुरम यांनी फायनान्स मॅनेजरविरोधात तक्रार केली आहे. मात्र अद्यापपर्यंत कोणतीही कार्यवाही झालेली नाही, असे त्यांनी सांगितले.