• सोलापूरचा महेंद्र गायकवाड पराभूत

अहिल्यानगर : पुण्याचा पैलवान पृथ्वीराज मोहोळ हा 67 वा महाराष्ट्र केसरी ठरला आहे. पृथ्वीराज मोहोळ याने सोलापूरचा पैलवान महेंद्र गायकवाड याचा अंतिम सामन्यात अत्यंत थरारक पद्धतीने पराभव केला. महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा अंतिम सामना हा अतिशय रंगतदार ठरला. दोन्ही पैलवान ताकदवान असल्याने हा सामना जास्त रंगात आला. अखेर पृथ्वीराजने योग्य संधी साधत पहिला गुण मिळवला. त्यानंतर महेंद्रने एक गुण मिळवत सामन्यात बरोबरी केली. पण त्यानंतर पृथ्वीराजने महेंद्रला चितपट करत असताना त्याला थेट रिंगणाच्या बाहेर ढकललं. यामध्ये पृथ्वीराजला आणखी एक गुण मिळाला. अखेर वेळ संपल्याने पृथ्वीराज मोहोळ हा विजयी ठरला. यानंतर त्याच्या समर्थकांनी मैदानात जोरदार जल्लोषाला सुरुवात केली.

67 व्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा आज अंतिम सामना पार पडला. त्याआधी गादी विभागामधून नांदेडचा शिवराज राक्षे विरुद्ध पृथ्वीराज मोहोळ तसेच माती विभागातून सोलापूरचा महेंद्र गायकवाड विरुद्ध परभणीचा साकेत यादव यांच्यात उपांत्य सामने पार पडले. गादी गटातून पृथ्वीराज मोहोळ अंतिम सामन्यात पोहोचला. तर माती गटातून महेंद्र गायकवाड हा अंतिम सामन्यात पोहोचला. यानंतर महेंद्र गायकवाड आणि पृथ्वीराज मोहोळ यांच्यात अंतिम सामन्याचा थरार रंगला.